अमरावती मार्गावरील तिवसा येथे दिवसाढवळ्या जनावरांची अवैध वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 10:02 PM2018-01-30T22:02:54+5:302018-01-30T22:04:52+5:30
स्थानिक पोलिसांनी मंगळवारी काही तासांच्या अंतराने दोन कारवायांमध्ये दोन मालवाहू ट्रकमधील ७० हून अधिक जनावरांना तिवसा पोलिसांनी जीवदान दिले. याप्रकरणी दोन्ही वाहनचालकांसह सहा आरोपींना अटक करण्यात आली. महामार्गावरील जुन्या टोल नाक्यावर या कारवाया करण्यात आल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक पोलिसांनी मंगळवारी काही तासांच्या अंतराने दोन कारवायांमध्ये दोन मालवाहू ट्रकमधील ७० हून अधिक जनावरांना तिवसा पोलिसांनी जीवदान दिले. याप्रकरणी दोन्ही वाहनचालकांसह सहा आरोपींना अटक करण्यात आली. महामार्गावरील जुन्या टोल नाक्यावर या कारवाया करण्यात आल्या.
जुन्या टोल नाक्यावरून दुपारी आरजे १७ जीए ४७२८ या मालवाहू ट्रकमध्ये ६० पेक्षा अधिक जनावरे कोंबून नेली जात होती. पोलिसांनी या जनावरांची सुटका केली. यावेळी हरिमोहन रामचंद्र चौधरी (४३), शरीफ अनामत अली (४०), रफिक गुलाम मियाज पठाण (३५), सादीर अब्दुल सलीम (३२) तिघेही रा. मध्यप्रदेश यांना अटक करण्यात आली. सायंकाळी ४ वाजता याच ठिकाणी एमएच २७ एक्स ८२१२ या ट्रकमध्ये ११ जनावरे कत्तलीकरिता नेली जात होती. या प्रकरणात मोहसीन खान (२५) व अब्दुल हाफिज (२२) दोघेही रा. अमरावती यांना अटक करण्यात आली.
पोलीस निरीक्षक सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमोल धोकणे, ढरक, आशिष बोरकर, दीपक सोनाळेकर, रवींद्र खंडारे, मिनेश खांडेकर, मोहसीन खान, वाहतूक पोलीस एस.सी. मावशे, जगन्नाथ धंदर आदींनी कारवाई केली.
महिन्याभरात २१४ जनावरे पकडली
तिवसा पोलिसांनी अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून जनावर तस्करांच्या मुसक्या आवळल्या असून, महिन्याभरात एकूण पाच कारवाया करीत २१४ जनावरांची सुटका करण्यात आली. या कारवायांमध्ये एकूण १५ आरोपींना अटक करण्यात आली.