बारूदच्या कांड्यांची वाहनातून बेकायदा वाहतूक!

By प्रदीप भाकरे | Published: March 22, 2024 01:55 PM2024-03-22T13:55:17+5:302024-03-22T13:55:50+5:30

स्फोटक परवान्याचे उल्लंघन : तिघांविरूध्द गुन्हा, २६५ स्फोटक कांडया, डिटोनेटर्स केबल जप्त.

illegal transportation of gunpowder sticks from vehicles | बारूदच्या कांड्यांची वाहनातून बेकायदा वाहतूक!

बारूदच्या कांड्यांची वाहनातून बेकायदा वाहतूक!

प्रदीप भाकरे, अमरावती: बारूदच्या स्फोटक कांड्या व डिटोनेटिंग केबलची कार व दुचाकीच्या माध्यमातून अवैध वाहतूक करणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असतांना २१ मार्च रोजी रात्री कु-हा ते तिवसा कौंडण्यपूर वाय पॉईंटजवळ ही कारवाई करण्यात आली. घटनास्थळाहून स्फोटक कांड्या, डिटोनेटिंग केबल, कार व दुचाकी जप्त करण्यात आल्या.

कुऱ्हा ठाण्याच्या हद्दीतून स्फोटकांची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. त्याआधारे कार व दुचाकीस्वार अशा तिघांना ताब्यात घेण्यात आले. आरोपी गजानन मारोतराव डंबारे (४४, रा. आमला, ता. चांदुर रेल्वे) हा त्याच्या कारमध्ये १४६ स्फोटक कांडया व ९९ नग डिटोनेटिंग केबलसह मिळून आला. तसेच त्याच्यासोबतच्या शुभम श्रीकृष्ण सुलताने (२२) व अविनाश राजेंद्र सुलताने (३०, दोन्ही रा. गोठा, ता. तिवसा) हे त्यांच्या दुचाकीवर ११९ नग स्फोटक कांडया व ८० नग डिटोनेटिग केबलसह आढळून आले. त्या एकुण २६५ नग कांड्या, १७९ डिटोनेटिंग केबल, एमएच ४६ एक्स ४६७८ ही ३.५० लाख रुपये किमतीची कार व एक दुचाकी असा एकुण ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ना परवाना ना कागदपत्रे

अटक तीनही आरोपी हे ब्लास्टिंगसाठी वापरण्यात येणारी स्फोटके खाजगी वाहनामध्ये बाळगून वाहतूक करतांना आढळून आले. त्यांच्याकडे स्फोटकांबाबतची कागदपत्रे तथा शॉर्ट फायररचा परवाना नव्हता. तो सोबत न बाळगता आरोपी परवान्यातील अटी व शर्तीचे उल्लंघन करुन तसेच सुरक्षाविषयक उपाययोजना न करता हाताळतांना आढळल्याने त्यांच्याविरूध्द कुऱ्हा पोलिसांत भारतीय स्फोटक अधिनियम १८८४ चे कलम ९ ब, १२ व भादंविच्या कलम २८६, ३३६, १८८ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला.

ग्रामीण भागात धडक मोहिम

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ग्रामीण पोलिसांतर्फे अवैध व्यवसायिक, अवैध शस्त्र व स्फोटके बाळगणारे, गुंड प्रवृत्तीचे इसमांवर कारवाईची धडक मोहीम राबविण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधिक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख किरण वानखडे यांच्या नेतृत्वात उपनिरीक्षक सागर हटवार व मुलचंद भांबुरकर, अंमलदार अमोल देशमुख, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, सचिन मसांगे, संजय प्रधान यांच्या पथकाने केली.

Web Title: illegal transportation of gunpowder sticks from vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.