झाडांच्या बुंध्यांशी आग लावून अवैध वृक्षतोड
By admin | Published: April 18, 2017 12:19 AM2017-04-18T00:19:41+5:302017-04-18T00:19:41+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील वलगाव-चांदूरबाजार राज्यमार्गावरील झाडांच्या बुंध्याशी आग लाऊन....
राज्यमार्ग ओसाड : वलगाव-चांदूरबाजार मार्गावर सर्रास प्रयोग
अमरावती : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील वलगाव-चांदूरबाजार राज्यमार्गावरील झाडांच्या बुंध्याशी आग लाऊन अवैध वृक्षतोडीची शक्कल लाकूड तस्करांनी लढविली आहे. त्यामुळे हा राज्यमार्ग ओसाड होत चालला असून याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.
रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड ही ब्रिटीशांची देण आहे. त्यानुसार राज्य व राष्ट्रीय महामार्गावर वृक्षांचे जाळे विणले आहेत. मात्र, जिल्ह्यात काही राज्यमार्गांवरील विशालकाय वृक्षांवर तस्करांची नजर असून दिवसा झाडांच्या बुंध्याशी आगी लाऊन रात्री अवैध वृक्षतोड केली जाते. आग लाऊन ती झाडे खिळखिळे करणे आणि अवैध वृक्षतोड करणारी टोळी जिल्ह्यात सक्रिय झाली आहे. अवैध वृक्षतोडीसाठी विशिष्ट समुदायातील व्यक्ती सहभागी असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ही बाब वनविभागाला चांगल्या तऱ्हेने माहितीे असताना ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असा प्रकार सातत्याने सुरु आहे. मात्र, वनविभाग आणि बांधकाम विभागातील काही अधिकाऱ्यांच्या मर्जीनेच राज्य मार्गावरील विशालकाय झाडे नष्ट केली जात आहेत. दिवसाढवळ्या झाडांच्या बुंध्यांना आग लावण्याचा प्रकार घडत असताना याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग ‘मौन’ आहे. अमरावती ते परतवाडा राज्य मार्गावरही हाच प्रकार यापूर्वी लाकूड तस्करांनी चालविला होता.
शहरालगतच्या आरागिरण्यांत लाकूड होते फस्त
अमरावती : त्यामुळे या मार्गावरील बहुतांश झाडे नष्ट झाली आहेत. आता वलगाव ते चांदूरबाजार राज्यमार्गाला लाकूड तस्करांनी लक्ष्य केले आहे. अवैध वृक्षतोड केल्यानंतर ते लाकूड शहरालगतच्या सीमेवरील आरागिरण्यांमध्ये फस्त केले जात आहे. मात्र, सीमेवरील आरागिरण्यांमध्ये विनापरवानगी लाकूड कोठून आणले जाते, हे तपासण्याची तसदी वनविभाग घेत नाही,हे वास्तव आहे. रेवसा, वलगाव परिसरात आरागिरण्यांमध्ये आडजात लाकूड मोठ्या संख्येने असल्याची विश्वसनीय माहिती आहे. मात्र, सदर आरागिरणी संचालकांचे राजकीय लागेबांधे असल्याने याआरागिरण्यांची तपासणी करण्यासाठी वनाधिकारी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील राज्यमार्ग ब्रिटीशकालिन वृक्षांनी नटलेला आहे. मात्र, यावृक्षांच्या बुंध्याशी आगी लाऊन ते नष्ट करण्याचा प्रकार अतिशय गंभीर आहे. याप्रकरणी दोषींना कठोर शासन देण्यासाठी पुढाकार घेऊ.
- संतोष जाधव
कार्यकारी अभियंता,
बांधकाम विभाग
परतवाडा मार्गावरील वृक्षतोड कुणाच्या आशीर्वादाने?
एकीकडे अमरावती-परतवाडा राज्यमार्ग हा हिरव्यागार वृक्षांनी नटलेला होता. मात्र, मागील चार-पाच वर्षांपासून या मार्गावरील वृक्षांची अवैध तोड करण्यात आली आहे. झाडांच्या बुंध्याशी आग लाऊन ब्रिटिशकालीन झाडे नष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे ही शेकडो वर्षांपूर्वीची झाडे कुणाच्या आशीर्वादाने नष्ट करण्यात आलीत, हे शोधून काढणे बांधकाम विभागासाठी आव्हान ठरणारे आहे. पर्यावरणाचा समतोल बिघडवणारा हा प्रकार तातडीने थांबविण्याची गरज पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे. दरवर्षी उन्हाळ्यात वृक्षांभोवती आग लावण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.