'माझी प्रकृती बरी आहे, काळजी करू नये'; बच्चू कडू यांचं ट्विटरच्या माध्यमातून आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 10:51 AM2023-01-11T10:51:23+5:302023-01-11T10:53:18+5:30
अमरावतीतील एका खासगी रुग्णालयात बच्चू कडू यांच्यावर उपचार सुरु आहेत.
नरेंद्र जावरे
अमरावती : प्रहार संघटनेचे नेते व अचलपूर मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. त्यांच्या पायाला व डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर अमरावतीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, कडू यांनी ट्विट करत आपल्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. सध्या प्रकृती ठीक असून काळजी करू नये, असे आवाहन बच्चू कडू यांनी ट्विटद्वारे केले आहे.
आज (दि. ११) सकाळी सहा ते साडेसहा वाजेच्या सुमारास अमरावती येथे बच्चू कडू यांचा अपघात झाला. सकाळी रस्ता ओलांडत असताना एका दुचाकीस्वाराने त्यांना जोराची धडक दिली. अपघातानंतर कडू यांना तातडीने अमरावतीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बच्चू कडू यांच्या डोक्याला चार टाके पडल्याचीही माहिती आहे.
आज सकाळी रस्ता क्रॉस करताना माझा अपघात झाला. माझी प्रकृती ठीक असुन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मला विश्रांतीची गरज आहे. कृपया सर्व हितचिंतकांना विनंती की कोणीही भेटायला येऊ नये.
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) January 11, 2023
आज सकाळी रस्ता ओलांडत असताना बच्चू कडू यांना दुचाकीस्वाराने भीषण धडक दिली. यामध्ये बच्चू कडू रस्त्याच्या डिव्हायडरवर आदळल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. तसेच, उजव्या पायालाही गंभीर दुखापत झाली. दरम्यान, कडू यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.