‘साक्षी मला माफ कर, माझी चूक झाली’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 11:31 PM2018-02-25T23:31:26+5:302018-02-25T23:31:26+5:30
आर्वीनजीक कार अपघातात दुर्देवी मृत्यू झालेल्या पत्नीची स्मशानभूमित अखेरची भेट घेताना 'साक्षी मला माफ कर' माझी खूप मोठी चूक झाली, असे भावनिक उद्गार जखमी अवस्थेतील पती पंकज लोंधे यांनी काढले.
संदीप मानकर ।
आॅनलाईन लोकमत
अमरावती : आर्वीनजीक कार अपघातात दुर्देवी मृत्यू झालेल्या पत्नीची स्मशानभूमित अखेरची भेट घेताना 'साक्षी मला माफ कर' माझी खूप मोठी चूक झाली, असे भावनिक उद्गार जखमी अवस्थेतील पती पंकज लोंधे यांनी काढले. यावेळी पत्नीच्या विरहात अश्रूला वाट मोकळी केली. हा हृदय हेलावणारा प्रसंग पाहताच उपस्थितांना अश्रू रोखता आले नाही. हजारोंच्या उपस्थितीत शनिवारी दर्यापूर येथील स्मशानभूमित अंत्यसंस्कार पार पडला.
दर्यापूर येथील विश्वकर्मा ज्वलर्सचे संचालक पंकज लोंधे, त्यांची पत्नी साक्षी व मुलगी सिया यांचा वर्धेला लग्नकार्यात जात असताना हा अपघात झाला. या घटनेनंतर एकीकडे मुलाला उपचारासाठी अमरावतीला दाखल केले, तर दुसरीकडे सुनेचा अंत्यसंस्कार! अशी परिस्थिती त्यांचे वडील व नातेवार्इंकावर ओढवली. साक्षीचे आर्वी येथे श्वविच्छेदन केल्यानंतर अंत्यसंस्कारही वेळेत करणे गरजेचे होते. पण तेव्हापर्यंत साक्षी गेल्याची माहिती उपचार घेत असलेल्या पंकजला नव्हती. ते पंकजला कसे सांगावे व जर नाही सांगितले तर पंकज नातेवाईकांना भविष्यात माफ करेल का? असे धर्मसंकट लोंधे कुटुंबीयांसमोर उभे ठाकले. डॉक्टरांनीही पंकजला यावेळी उपचाराची गरज असल्याने रिक्स घेता येणार नाही, असे सांगितले. पण काही वेळानंतर मोठ्या हिमतीने साक्षी गेल्याची माहिती नातेवाईकांनी पंकजला दिली. मला साक्षीजवळ आताच घेऊन चला. तिला शेवटचे पाहयचे आहे, असे म्हणत हाताची सलाईन काढून पंकज सायंकाळी ७.३० वाजता स्मशानभूमित पोहचले. साक्षीचा मृतदेह दुरून पाहताच त्यांनी मोठ्याने हंबरडा फोडला. माझी साक्षी कुठे आहे? माझी सिया कशी आहे, असे उपस्थिताना विचारू लागले. मृतदेहावर डोके ठेवून रडू लागले. पंकज यांचे एका तपापूर्वी मातृत्व हरविले. त्यातून ते कसेबसे सावरले नाही तोच पाच वर्षांच्या पहिल्या मुलीचे निधन झाले. त्यानंतर काही वर्षांनंतर दुसºया मुलाचाही मृत्यू झाला. काही वर्षांनी सिया नावाची तिसरी मुलगी झाली. या अपघातात थोडक्यात बचावलेली चार वर्षीय सियाचे संगोपण आनंदात सुरू असताना व सुखीसंसाराचा गाडा हाकत असताना अचानक एका क्षणात पत्नीनेही साथ सोडल्याने पंकजसह लोंधे कुटुंबीयावर दु:खाचे सावट पसरले. अतिशय सोज्वळ व मनमिळावू स्वाभावाची असलेली साक्षी व तेवढ्याच मोठ्या मनाचा असलेले पंकज यांच्याबदल बाबाप्रेमींना व नागरिकांना विशेष आस्था आहे.