आयएमएचा राज्यभर आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 10:19 PM2017-11-02T22:19:11+5:302017-11-02T22:19:22+5:30
धामणगाव रेल्वे येथील अशोक सकलेचा यांच्या रुग्णालयात चिमुकलीचा मृत्यू झाल्याच्या कारणावरून नातलग व जमावाने डॉक्टरांच्या वाहनांना व हॉस्पिटलच्या मालमत्तेला आग लावून प्रचंड नुकसान केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : धामणगाव रेल्वे येथील अशोक सकलेचा यांच्या रुग्णालयात चिमुकलीचा मृत्यू झाल्याच्या कारणावरून नातलग व जमावाने डॉक्टरांच्या वाहनांना व हॉस्पिटलच्या मालमत्तेला आग लावून प्रचंड नुकसान केले. या घटनेचा इंडियन मेडिकल असोसिएशनच्या जिल्हा शाखेच्यावतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला. या घटनेतील हल्लेखोरांवर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी गुरुवारी आयएमएचे उपाध्यक्ष डॉ. वसंत लुंगे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली. यावर कारवाई न केल्यास राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.
धामणगाव रेल्वे येथील सकलेचा रुग्णालयात १ नोव्हेंबर रोजी काही असामाजिक तत्त्वांनी अचानक हल्ला करीत रूग्णालयातील हॉस्पिटलची तोडफोड सुरू केली. हॉस्पिटलमधील काचा, खिडक्या फोडल्या. खाटा, कूलर व अन्य साहित्य बाहेर काढून आगीच्या स्वाधीन करण्यात आले. टीव्हीची तोडफोड केली तसेच घराजवळ पार्क केलेली सकलेचा यांची नवी कार व दुचाकीही जाळण्यात आली. हा प्रकारण अतिशय निंदाजनक आहे. त्यामुळे या घटनेतील दोषीवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी आयएमएने जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. निवेदन देतेवेळी दिनेश ठाकरे, दिनेश वाघाडे, अमिती देशमुख, राजीव जामठे, गणेश पुंडकर, भरत शहा, अलका कुचे, अनिल रोहनकर, श्याम राठी, नीलिमा ठाकरे, पंकज घुंडीयाल, धीरज मुरके यांच्यासह अन्य डॉक्टर उपस्थित होते.