अतिवृष्टी नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:09 AM2021-07-12T04:09:53+5:302021-07-12T04:09:53+5:30
अमरावती : जिल्ह्यात काही तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले असून, त्याबाबत तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश महिला व ...
अमरावती : जिल्ह्यात काही तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाले असून, त्याबाबत तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी रविवारी जिल्हा प्रशासनाला दिले.
भातकुली, दर्यापूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातील नउ महसूल मंडळात अतिवृष्टी झाल्याने पीकनुकसान व इतर हानी झाली आहे. त्यामुळे या परिसरात सविस्तर व परिपूर्ण पंचनामे करण्याचे निर्देश ना. ठाकूर यांनी दिले.पंचनामे अत्यंत दक्षतापूर्वक व तपशीलवार करावेत. प्रत्येक अतिवृष्टीबाधिताला न्याय मिळणे आवश्यक आहे. कोरोना संकटकाळात शेती क्षेत्राचे नुकसान झाले. त्यात या परिसरात अतिवृष्टीचे संकट उदभवले. शेतकरी बांधवांना परिपूर्ण नुकसानभरपाई मिळवून देण्यात येईल.
महाविकास आघाडी शासन शेतकरी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही ना. ठाकूर यांनी दिली.
बॉक्स
पंचनामे अचूक करा
पंचनामे करताना शेतकरी बांधवांशी संवाद साधून परिपूर्ण माहिती घ्यावी व सर्व क्षेत्राची पाहणी करावी. शेतकरी बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी पंचनामे अचूक व सविस्तर करावेत. ही कार्यवाही तत्काळ पूर्ण करावी. एकही अतिवृष्टीबाधित शेतकरी बांधव भरपाईपासून वंचित राहता कामा नये, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.