लसीकरणाची कूर्मगती, ज्येष्ठांचा दुसरा डोस वेटिंगवर, लसींचा ठणठणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 05:00 AM2021-05-10T05:00:00+5:302021-05-10T05:00:54+5:30

जिल्ह्यात १६ फेब्रुवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला १२ केंद्रांद्वारे लसीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर, तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरचे ज्येष्ठ नागरिक, चौथ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील कोर्माबिडीटी रुग्ण व आता पाचव्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येत आहे व या पाचव्या टप्प्यातील लाभार्थींची मोठी गर्दी लसीकरण केंद्रांवर होत आहे.

Immediate rate of immunization, second dose of seniors on waiting, immunization | लसीकरणाची कूर्मगती, ज्येष्ठांचा दुसरा डोस वेटिंगवर, लसींचा ठणठणाट

लसीकरणाची कूर्मगती, ज्येष्ठांचा दुसरा डोस वेटिंगवर, लसींचा ठणठणाट

Next
ठळक मुद्देकेंद्रांवर पहाटे ५ पासून रांगा, मागणीच्या तुलनेत शासनाकडून पुरवठाच नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर पाच टप्प्यातील नागरिकांच्या रांगा लागत आहेत. जिल्ह्यास रोज किमान १५ हजार डोसची आवश्यकता असताना लसींचा ठणठणाट आहे. त्यामुळे नागरिकांना केंद्रावरून परत जावे लागत आहे. जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने कोविशिल्ड व कोव्हॅक्सीन या दोन्ही लसींची प्रत्येकी दोन लाख डोसची मागणी केलेली असताना आतापर्यंत ३,४१,१०० डोस मिळाले आहेत. मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने जिल्ह्यातील लसीकरण विस्कळीत झालेले आहे.
जिल्ह्यात १६ फेब्रुवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला १२ केंद्रांद्वारे लसीकरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर, तिसऱ्या टप्प्यात ६० वर्षांवरचे ज्येष्ठ नागरिक, चौथ्या टप्प्यात ४५ वर्षांवरील कोर्माबिडीटी रुग्ण व आता पाचव्या १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना लस देण्यात येत आहे व या पाचव्या टप्प्यातील लाभार्थींची मोठी गर्दी लसीकरण केंद्रांवर होत आहे.
 जिल्ह्यात सद्य:स्थितीत पाच हजार डोस शिल्लक असल्याने आता १३५ पैकी मोजकीच केंद्रे सुरू आहेत.  आतापर्यंत ३ लाख १९ हजार ५०२ नागरिकांना शनिवारपर्यंत लसीकरण करण्यात आल्याची माहिती आरोग्य यंत्रणेद्वारे देण्यात आली.

ग्रामीणमध्येही ठणठणाट
जिल्ह्यात सद्य:स्थितीत ऑनलाइन नोंदणी केलेल्या १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण सुरू आहे. यामध्ये कोविशिल्डचा ठणठणाट आहे, तर कोव्हॅक्सिनचा पहिला डोस देण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात १८ हजार डोसचा पुरवठा करण्यात आला होता. मात्र, लसींची मोजकीच संख्या असल्याने कोविशिल्डचा दुसरा डोस देण्याला प्राधान्य देण्यात आल्याचे सांगण्यात आले. रविवारी लसीचा साठा संपल्याने शहरात फक्त आयसोलेशन दवाखाना येथे व धारणी तालुक्यातील काही केंद्रांवर लसीकरण होणार असल्याचे सांगण्यात आले.

तरुणांसह ज्येष्ठही वैतागले

गुरुवारी १८ हजार डोस आल्याने लसीकरण सुरू झाले. केंद्रावर रांगेत लागल्यावर तासाभराने डोस संपल्याचे सांगण्यात आले. दुसऱ्या दिवसी अन्य केंद्रावर मिळेल असे सांगण्यात आल्याने आता वाट पाहिल्याशिवाय गत्यंतर नाही.
- लक्ष्मणराव बावने

पहिला डोस घेतल्यानंतर सात आठवडे झाले आहेत. मात्र, केंद्रावर लस नाही असे सांगण्यात येत आहे. पहिल्या डोसच्या वेळी गर्दी नव्हती. आता दीड महिन्यांत एवढी गर्दी होत आहे. त्यामुळे दुसरा डोस घ्यावा की नाही असे वाटते.
- पांडुरंग कराळे

जिल्ह्यात रोज किमान १५ हजार डोसची आवश्यकता आहे. मात्र, त्या तुलनेत कमी डोस मिळत असल्याने नियोजन कोलमडते आहे. आम्ही दोन्ही लसींच्या प्रत्येकी दोन लाख डोसची मागणी नोंदविली आहे. प्रत्यक्षात पुरवठा कमी होत आहे.
- डॉ. दिलीप रणमले, जिल्हा आरोग्य अधिकारी

१८ ते ४४ वयोगटात ऑनलाईन नोंदणी 
१८ ते ४४ वयोगटातील लाभार्थ्यांची कोविड पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे. तारीख, वेळ आणि केंद्र निश्चित करून लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी जाणे महत्त्वाचे आहे. ऑनलाइन नोंदणी व अपाॅइंटमेंट वयोगट आवश्यक आहे. याशिवाय लस दिली जात नाही. ४५ वर्षांवरील लाभार्थ्यांसाठी जिल्ह्यात सद्य:स्थितीत लस उपलब्ध नाही. जोवर डोस प्राप्त होणार नाही तोवर नागरिकांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

पहाटेपासून लागतात केंद्रांवर रांगा
लसीकरणासाठी लवकर नंबर लागावा यासाठी  केंद्रांवर पहाटे पाचपासून रांगा लागत असल्याचे दिसून आले. प्रत्यक्षात केंद्रांवर सकाळी १० वाजता सुरुवात होत आहे. लस संपल्यावर लसीकरण बंद करण्यात येत असल्यामुळे नागरिकांच्या रोषाचा कर्मचाऱ्यांना सामना करावा लागत आहे. शहरातील नागरिक लसीसाठी ग्रामीण भागातील केंद्रांवर जाऊन रांगेत लागत आहेत.

 

Web Title: Immediate rate of immunization, second dose of seniors on waiting, immunization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.