पोलीस असल्याची बतावणी; वृद्धाला लुटले, सोन्याची अंगठीही केली लंपास
By प्रदीप भाकरे | Published: May 5, 2023 01:55 PM2023-05-05T13:55:55+5:302023-05-05T14:07:16+5:30
मोर्शीतील घटना : कागदाच्या पुडीत अंगठीएैवजी दिसली रेती
अमरावती : पोलीस असल्याची बतावणी करून एका वृध्दाकडील सुमारे २० हजार रुपयांची सोन्याची अंगठी हातचलाखीने लंपास करण्यात आली. मोर्शी येथील शिवाजी हायस्कुलसमोर ४ मे रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी सेवानिवृत्त कर्मचारी रामदास धांडे (६५, रा. पेठपुरा, मोर्शी) यांच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी अनोळखी दुचाकीस्वाराविरूध्द गुन्हा दाखल केला.
धांडे हे गुरूवारी सायंकाळी सायकलने गुलाब जामूनचे पाकीट खरेदी करण्याकरिता जयस्तंभ चौक मोर्शी येथे जात असताना शिवाजी हायस्कूलसमोरील रोडवर एका ३० वर्षे वयाच्या अनोळखी इसमाने त्यांना थांबण्यास सांगितले. दुचाकीवर असलेल्या त्या अनोळखी तरूणाने तो पोलीस असल्याची बतावणी केली. आपली येथे ड्युटी आहे. तुमच्याकडील थैली चेक करायची आहे, असे त्याने बजावले. तथा त्यांच्याकडील थैली तपासली. त्याचवेळी धांडे यांच्या बोटातून त्या अनोळखीने २० हजार रुपये किमतीची वापरती अंगठी काढून घेतली. ती एका पांढऱ्या कागदात अंगठी ठेवली आहे, ती तुम्ही ठेवा असे म्हणून तो दुचाकीने पळाला.
पोलिसांनी नोंदविला गुन्हा
धांडे यांनी लगेचच त्या अनोळखी इसमाने थैलीत ठेवलेल्या कागदी पुडीची पाहणी केली. त्यावेळी त्यात सहा ग्रॅमची त्यांची अंगठी दिसून आली नाही. त्यात अंगठीऐवजी रेती आढळून आली. त्या अनोळखी तरूणाने हातचलाखी करून आपली फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर रामदास धांडे यांनी घटनेनंतर पोलीस ठाणे गाठले. मोर्शी पोलिसांनी रात्री ८.४१ च्या सुमारास अज्ञाताविरूध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.