तालुकास्तरीय समित्या कार्यान्वित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2021 04:10 AM2021-07-15T04:10:35+5:302021-07-15T04:10:35+5:30
अमरावती : जिल्ह्यातील लघुसिंचन योजना व जलस्त्रोतांची सहावी प्रगणना सुरू होत आहे. त्यासाठी आवश्यक तालुकास्तरीय समित्या स्थापन करून कार्यवाहीला ...
अमरावती : जिल्ह्यातील लघुसिंचन योजना व जलस्त्रोतांची सहावी प्रगणना सुरू होत आहे. त्यासाठी आवश्यक तालुकास्तरीय समित्या स्थापन करून कार्यवाहीला चालना द्यावी, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी यांनी मंगळवारी दिले.
लघुसिंचन योजना व जलस्त्रोतांची सहावी प्रणगना जिल्हास्तरीय समितीची ऑनलाईन बैठक सिद्धभट्टी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सदस्य सचिव तथा जिल्हा जलसंधारण अधिकारी दिलीप निपाणे यांच्यासह विविध अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
प्रगणनेचे काम प्रत्यक्ष सुरू होण्यासाठी तालुका समित्या कार्यान्वित होणे गरजेचे आहे. या कामासाठी जलसंपदा, जलसंधारण, जिल्हा परिषदेचा लघुसिंचन विभागासह ग्रामस्तरावर ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक यांनाही सहभागी करून घ्यावे. त्याचप्रमाणे क्षेत्रीय किंवा पर्यवेक्षकीय कामासाठी इतरही मनुष्यबळ मिळवण्याच्या तरतुदीनुसार कार्यवाही करावी. या गणनेसाठी प्रगणकांना प्रशिक्षित करणे आवश्यक आहे. त्यानुसार प्रशिक्षण कार्यक्रमाची आखणी करावी, असेही निर्देश सिद्धभट्टी यांनी दिले.
भूपृष्ठाखालील जलसाठ्याच्या वापरासाठी साध्या विहिरी, उथळ, मध्यम व खोल कूपनलिका, भूपृष्ठावरील जलसाठ्याच्या वापरासाठी दोन हजार हेक्टर सिंचन क्षमतेचे लघुसिंचन योजना, धरण, कालवे, बंधारे, विमोचक, बंद नलिका वितरण प्रणाली आदींमुळे केले जाणारे प्रवाही सिंचन आणि नदी, नाले, बंधारे, जलाशय आदींवरील उपसा सिंचन योजना, नागरी व ग्रामीण भागातील जलसाठे व दोन हजार हेक्टरवरील सिंचन क्षमतेचे मोठे मध्यम प्रकल्प, उपसा सिंचन योजना तसेच कृषी व मृदसंधारण विभागातील सिमेंट बंधारे, शेततळे, सिंचन विहीरी, भूजल सर्वेक्षण यंत्रणेशी संबंधित कूपनलिका आदी बाबींची प्रणगना होणार असल्याची माहिती निपाणे यांनी दिली.