अमरावती विद्यापीठातही ‘चाॅईस आणि क्रेडिट बेस्ड’ प्रणाली लागू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2022 11:59 AM2022-03-29T11:59:52+5:302022-03-29T12:02:31+5:30
चाॅईस आणि क्रेडिट बेस्ड प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना मुक्त निर्णय घेता येणार आहे. कला, वाणिज्य अथवा विज्ञान शाखेत अन्य विषयाची निवड करून पदवी मिळविता येणार आहे.
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावतीविद्यापीठाने नव्या शैक्षणिक धोरणानुसार ‘चाॅईस आणि क्रेडिट बेस्ड’ प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांना या नव्या प्रणालीनुसार आवडीनिवडीने अभ्यासक्रम घेता येणार आहे. चालू शैक्षणिक सत्रापासून याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती आहे.
यापूर्वीच्या शैक्षणिक प्रणालीत यंत्रणा ठरवेल, तोच अभ्यासक्रम अथवा विषयाच्या शाखेत प्रवेश घेता यायचा. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या धोरणात आता कला, वाणिज, विज्ञान या शाखेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार विषय, अभ्यासक्रम घेता येणार आहे. चाॅईस आणि क्रेडिट बेस्ड प्रणालीमुळे विद्यार्थ्यांना मुक्त निर्णय घेता येणार आहे. कला, वाणिज्य अथवा विज्ञान शाखेत अन्य विषयाची निवड करून पदवी मिळविता येणार आहे. पाच प्रकाराच्या कोर्सचा लाभ घेता येणार आहे. नृत्य, संगीत, कला अशा विविधांगी विषयाची पदवी मिळविण्याची नव्या धोरणात तरतूद आहे. त्याकरिता केवळ प्राचार्यांची परवानगी आवश्यक असणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना स्वयम, ऑनलाईन अभ्यासक्रमाचेसुद्धा धडे गिरविता येणार आहेत.
अभ्यासक्रमावर मिळेल पदवी
नव्या शैक्षणिक प्रणालीत विद्यार्थ्यांनी किती तास अभ्यास केला यावर आधारित पदवी निश्चित होणार आहे. दोन क्रेडिट बेस्ड पूर्ण केल्यास प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच उन्हाळी, हिवाळीमध्ये कार्यानुभव घेता येणार आहे. तीन वर्षांत १४० क्रेडिट गुण तर १० गुण नॉन एक्झामचे मिळविताच ग्रेड पॉईंट मिळेल. सेमिस्टर ग्रेड, सिम्युलिटीवर गुणवत्ता ठरणार आहे.
‘चाॅईस आणि क्रेडिट बेस्ड’ प्रणाली ही विद्यार्थिभिमुख आहे. यात विद्यार्थ्यांना प्राधान्य असणार आहे. आता यंत्रणा नव्हे तर विद्यार्थी अभ्यासक्रम, विषयाबाबत निर्णय घेऊ शकणार आहेत. विषय निवडीबाबत कोणत्याही प्रकारचे बंधन असणार नाही.
- हेमंत देशमुख, संचालक, परीक्षा व मूल्यांकन मंडळ, अमरावती विद्यापीठ.