भारत महासत्ता बनण्यात विद्यापीठांची महत्त्वपूर्ण भूमिका; राज्यपाल रमेश बैस यांचा आशावाद
By गणेश वासनिक | Published: February 24, 2024 03:45 PM2024-02-24T15:45:13+5:302024-02-24T15:45:26+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा चाळिसावा दीक्षांत समारंभ उत्साहात
अमरावती : शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सव्दारे व्यापक परिवर्तन येणार असून विद्यार्थ्यांनी त्याचे फायदे व भविष्यात होणारे नुकसान लक्षात घेऊन आपल्या ज्ञानाची कक्षा रुंद करावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत विश्वगुरू होत असून जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था होण्याकडे वाटचाल सुरू आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीनंतर भारत विश्वातील महाशक्ती बनेल, त्यात विद्यापीठांची महत्त्वपूर्ण भूमिका राहील, असा आशावाद राज्यपाल रमेश बैस यांनी शनिवारी व्यक्त केला.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या चाळिसावा दीक्षांत समारंभाच्या अध्यक्षस्थानी मुंबई येथील राज्यपाल भवनातून ते आभासी उपस्थित राहून मार्गदर्शन करीत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्लीचे उपाध्यक्ष प्रा. दीपककुमार श्रीवास्तव, कुलगुरू डॉ. मिलिंद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. प्रसाद वाडेगावकर, कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.आर.एम. कडू, डॉ.आर.डी. सिकची, डॉ.व्ही.एच. नागरे, डॉ.एच.एम. धुर्वे, डॉ. मोना चिमोटे, डॉ.यू.बी. काकडे, मोनाली तोटे पाटील, डॉ. नितीन कोळी, डॉ. व्ही. एम. मेटकर, ए. एम. बोर्डेे, प्रा. अनुपमा कुमार, डॉ. वैशाली गुडधे, डॉ. डी. डब्ल्यू. निचित, डॉ. तनुजा राऊत, डॉ. व्ही. आर. मानकर आदी उपस्थित होते.
राज्यपाल बैस पुढे म्हणाले, विद्यापीठांनी शैक्षणिक दर्जा वाढविण्याचा सातत्याने प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांमधील उद्योजकता आणि नवकल्पनांना वाव द्यावा. दत्तक ग्राम, सामाजिक उपक्रमांमध्ये तसेच विद्यापीठाच्या विकास व विस्तारामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवावा, असे सांगून पदके व पारितोषिक प्राप्त विद्यार्थी आणि आचार्य पदवीधारकांना त्यांनी भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. विद्यापीठ स्थापनेला चाळीस वर्षे पूर्ण झाली असून शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांनी कौतुक केले.
स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा सुवर्ण पदकांचे आठ गुणवंत ठरले मानकरी
अभियांत्रिकीच्या विविध सहा शाखांमधून आणि सर्व शाखांतून गुणवत्ता प्राप्त एक अशा आठ विद्यार्थ्याना स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा सुवर्ण पदकांचे गौरविण्यात आले. यात प्राजंल डेरे (बडनेरा), शशांक सुर्जेकर (बडनेरा), श्रेया खर्चे (शेगाव), अमिषा दापोडकर (यवतमाळ), साक्षी कावळे (यवतमाळ), तेजस पुरी (अमरावती), रोशन दाभाडे (अमरावती), रेवा ईंगळे (मास क्युनिकेशन, अमरावती) या गुणवंताचा समावेश आहे.
वैष्णवी, स्नेहल, गुंजन या ठरल्या ‘टॉप थ्री’
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाची वैष्णवी संजय मुळे या विद्यार्थीनीला सर्वाधिक ६ सुवर्ण व १ रोख पारितोषिक, श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, आकोट, जि. अकोला येथील स्नेहल गजानन इंदाणे या विद्यार्थीनीला ५ सुवर्ण, ४ रौप्य व २ रोख पारितोषिक , तर डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय, अमरावतीची गुंजन अजित गुप्ता या विद्यार्थीनीला ५ सुवर्ण, २ रौप्य व १ रोख पारितोषिक सर्वाधिक पदके व पारितोषिकाने कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी सन्मानित केले.