कंपोस्ट डेपोत प्लास्टिक प्रोसेसिंग युनिट कार्यान्वित
By Admin | Published: September 30, 2016 12:26 AM2016-09-30T00:26:20+5:302016-09-30T00:26:20+5:30
सुकळी कंपोस्ट डेपो येथे अविघटनशील कचऱ्याचा विल्हेवाट प्रकल्प कार्यान्वित करण्याचे नियोजित आहे.
महापौर, आयुक्तांची उपस्थिती : घनकचरा व्यवस्थापनाकडे एक पाऊल
अमरावती : सुकळी कंपोस्ट डेपो येथे अविघटनशील कचऱ्याचा विल्हेवाट प्रकल्प कार्यान्वित करण्याचे नियोजित आहे. त्याअनुषंगाने प्लास्टिक प्रोसेसिंग मशीनचे उद्घाटन महापौर चरणजीतकौर नंदा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या मशीनद्वारे प्लास्टिक प्रोसेसिंगची प्रात्यक्षिक दाखविण्यात आली. ही मशीन प्लास्टिक व्यवस्थापन करणारी आहे. या मशीनद्वारे प्लास्टिकचे आकारमान कमी होणार आहे. आकारमानात ८० ते ९० टक्के इतके कमी होऊ शकते. प्लास्टिकचा आकार मोठा असतो व वजनाने हलके असते. त्यामुळे या मशीनमुळे मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कमी होऊ शकणार आहे. ७० ते ९० किलो इतकी प्लास्टिकची गठाण तयार करता येते. ६ ते ९ मिनिटांत प्लास्टिकची एक गठाण तयार होते. या प्रक्रियेत प्रदूषण निर्माण होत नाही व हा प्रकल्प इको फ्रेण्डली आहे. यापासून तयार होणाऱ्या प्लास्टिक गठाणाला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
पॉलिथीनवर प्रक्रिया करणारे हे युनिट आहे. एचव्हीपीएमनी या प्रकल्पासाठी मदत केली आहे. नागरिकांनी प्लास्टिक वेगळे करून दिल्यास या प्रकल्पाद्वारे या प्लास्टिकचे निर्मूलन होऊ शकणार आहे. अमरावतीकर नागरिकांनी या प्रकल्पाला प्रतिसाद दिल्यास प्लास्टिक निर्मूलन करणे सुलभ होईल, असे आवाहन महापालिका आयुक्त हेमंत पवार यांनी केली. यावेळी खत कंपोस्ट डेपो येथे महापौर चरणजीतकौर नंदा यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमास स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, मनपा आयुक्त हेमंतकुमार पवार, अतिरिक्त आयुक्त सोमनाथ शेटे, बबलू शेखावत, प्रवीण हरमकर, अंजली पांडे, नगरसेवक विलास इंगोले यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.