महिलांना ढाल करून अवैध दारूविक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2018 10:09 PM2018-12-02T22:09:14+5:302018-12-02T22:09:51+5:30
पैसे कमाविण्याच्या नाईलाजाने अवैध दारूविक्री करणाऱ्या महिलांची संख्या शहरात बरीच असल्याचे शहर पोलिसांकडून अलीकडच्या काळात नोंदविलेल्या गुन्ह्यांतून स्पष्ट झाले आहे.
वैभव बाबरेकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : पैसे कमाविण्याच्या नाईलाजाने अवैध दारूविक्री करणाऱ्या महिलांची संख्या शहरात बरीच असल्याचे शहर पोलिसांकडून अलीकडच्या काळात नोंदविलेल्या गुन्ह्यांतून स्पष्ट झाले आहे. आठवडाभरात अवैध दारूविरोधात कारवाई करताना शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तब्बल पंधरा महिलांविरुद्ध कलम ६५ (फ) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंदविले गेले आहेत.
शहरात अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाया होत असतात. शेकडो नागरिक अवैध दारूविक्री व्यवसायात गुंतले आहेत. अलीकडे मात्र पोलिसांच्या कारवायांमधून मुख्य आरोपी म्हणून महिलांचे नाव उमटत आहे. निम्न मध्यमवर्गीय किंवा झोपडपट्टी परिसरात सर्वाधिक अवैध दारूव्यवसाय चालविल्या जात असल्याचे निरीक्षण आहे. पूर्वी अवैध दारूविक्री व्यवसायात केवळ पुरुषांचाच सहभाग राहायचा. मात्र, गेल्या काही वर्षांत या व्यवसायात महिलांचाही सहभाग वाढला आहे. दारूविक्री व्यवसाय करणारी पुरुष मंडळी स्वत: त्याच्या आहारी जातात. अशातून त्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबाचा उदरनिर्वाह कठीण होतो. कुटुंबप्रमुखाची जबाबदारी घरातील महिलेवर येते. पती गेल्यानंतर मोलमजुरी करावी की त्याचा गुत्ता चालवावा, असे प्रश्न तिच्यापुढे उभे ठाकतात. या व्यवसायात महिलांचा शिरकाव होण्यास बड्या मद्यविक्रेत्यांचे दलाल व मद्यपींचे गैरवाजवी सल्लेदेखील कारणीभूत ठरतात. एकदा महिलेने अवैध दारूविक्रीत पाऊल टाकले, की तिच्याकडून उधारीत दारू पिण्याची वा गुन्हेगारीसाठी मोकळीक मिळण्याची अपेक्षाही या ‘सल्ल्यां’मागे असते. दारू व्यवसायात पैसा पाहून महिलांनासुद्धा मोलमजुरी कंटाळवाणी वाटते. मात्र, पोलीस कारवाई सुरू झाली की, त्यांना परिस्थितीची जाणीव होते. अशा स्थितीतही पोलिसांशी हुज्जत घालण्याचे धाडस त्या दाखवितात. मात्र, कायदा व सुव्यवस्थेची धुरा सांभाळणारे महिलांची हयगय करीत नसल्याचे वास्तव आहे.
‘मोठे मासे’ केव्हा लागणार गळाला?
शहरातील अवैध दारू विकणारे माल आणतात कोठून, ही बाब जगजाहीर असते. शहरातील मोठ्या व्यावसायिकांकडूनच ते दारू खरेदी करतात, ही बाब पोलीस प्रशासनासह जनसामान्यांना माहिती आहे. मात्र, आजपर्यंत यामध्ये गुंतलेल्या मोठ्या व अधिकृत दारूविक्रेत्यांवर कधीच कारवाईचा बडगा उगारला गेला नाही. अवैध दारूविक्रेत्यांना तात्काळ ताब्यात घेऊन गुन्हे दाखल केले जातात; मोठ्या व्यावसायिकांवर कारवाई का होत नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
दलाल महिलांना ढकलतात दारू व्यवसायात
निराधार वा विधवा महिलांच्या परिस्थितीचा फायदा घेऊन पुरुष दलाल त्यांना या अवैध दारूविक्रीच्या व्यवसायात ढकलतात. दारूविक्रीतून होणाऱ्या नफ्याचे आमिष त्यांना दाखविले जाते. अडचणीत असलेल्या महिलांना कधी कौटुंबिक, तर कधी सामाजिक सुरक्षेच्या कारणावरून या व्यवसायात उडी घ्यावी लागते. एकदा या व्यवसायातील खाचाखोचा माहिती झाल्यानंतर त्यांना यामधून बाहेर पडता येत नाही.
पोलिसांकडून या ठिकाणी कारवाई
शहरातील वडाळी व पारधी बेड्यावर सर्वाधिक अवैध दारू विकणारे असल्याचे आजपर्यंतच्या पोलीस कारवाईवरून निदर्शनास येते. वडाळी परिसरातील परिहारपुरा, पिंपळखुटा, शेंदोळा येथील पारधी बेडा, रहाटगाव झोपडपट्टी, माधवनगर, आनंदनगर, महाजनपुरा, म्हाडा कॉलनी, दसरा मैदानाजवळील झोपडपट्टीसह अन्य काही परिसरात महिलांविरुद्ध अवैध दारूविक्रीप्रकरणी पोलिसांनी कारवाई गुन्हे नोंदविले आहेत.
पोलीस महिलांवर कारवाई करण्यास धजावत नाहीत, असा समज करून काही पुरुष दारूविक्रीसाठी महिलांना पुढे करतात. तथापि, पोलिसांकडून पुरुषांसह महिलांवरही कारवाई करण्यात येते. पुरुष दारूचा माल आणून देतात व महिला विक्री करीत असल्याचे आढळले आहे.
- यशवंत सोळंके
पोलीस उपायुक्त