तोतया प्रशासकीय निरीक्षकाला कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 06:00 AM2020-02-02T06:00:00+5:302020-02-02T06:01:08+5:30
पोलीस सूत्रांनुसार, सुबोध दीपक खोब्रागडे (१९, रा. प्रवीणनगर, व्हीएमव्ही, अमरावती), असे अधिकाºयाचा बनाव करणाºया तोतयाचे नाव आहे. या प्रकरणात फ्रेजरपुराचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले यांना ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात वाहनचालकाने कॉल केला.
अमरावती : देशाच्या राष्ट्रपतींकडे ‘अॅडमिनिस्ट्रेटिव्ह आॅब्झर्व्हर’ असल्याची बतावणी करणाऱ्या अवघ्या १९ वर्षीय युवकाला फ्रेजरपुरा पोलिसांनी ३१ जानेवारी रोजी रात्री ११.३० च्या सुमारास गजाआड केले. त्याची माहिती त्याच्या वाहनावर चालक असलेल्या २५ वर्षीय युवकाने पोलिसांना दिली. त्यावरून अमरावतीचाच रहिवासी असलेल्या या युवकाचे बिंग फुटले. शनिवारी त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
पोलीस सूत्रांनुसार, सुबोध दीपक खोब्रागडे (१९, रा. प्रवीणनगर, व्हीएमव्ही, अमरावती), असे अधिकाºयाचा बनाव करणाºया तोतयाचे नाव आहे. या प्रकरणात फ्रेजरपुराचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले यांना ३१ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात वाहनचालकाने कॉल केला. एक इसम आयएएस अधिकारी म्हणून मागील १० दिवसांपासून कारवर अंबर दिवा लावून शहरात फिरत आहे व जेल रोड येथील स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमात येणार असल्याची माहिती त्याने बालाजी लालपालवाले यांना दिली. त्यावरून पोलीस निरीक्षक पुंडलिक मेश्राम, सहायक पोलीस निरीक्षक इंगळे, पोलीस उपनिरीक्षक मंठाळे हे कर्मचाऱ्यांसह जेल रोडवरील शासकीय मुलींचे वसतिगृहात धडकले. वॉर्डनची परवानगी घेऊन त्यांनी आत पाहणी केली असता, एमएच २७ एक्स ९८९० क्रमांकाचे चारचाकी वाहन निदर्शनास आले. त्यावर अंबर दिवा लावलेला होता.
पोलिसांनी चारचाकीच्या चालकाची चौकशी केली असता, त्याने सागर राजू ढोके (२५, रा. गजानन नगर, अमरावती) अशी स्वत:ची ओळख दिली आणि त्यानेच पोलिसांना कळविल्याचे सांगितले. त्याने सुबोधला बोलावून घेतले. पोलिसांना त्याने आयएएस अधिकारी असल्याचे सांगत, ‘अॅडमिनिस्ट्रेटिव्ह आॅफिसर आॅफ आॅनरेबल प्रेसिडेंट आॅफ इंडिया’ अशी ओळख दिली. पोलिसांनी संशयावरून त्याच्याकडील बॅगची तपासणी केली व अंगझडती घेतली असता, त्यात राजमुद्रा अंकित बनावट शासकीय दस्तावेज आढळले. त्याच्याकडील कारसह ३ लाख १ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच्याविरुद्ध पीएसआय बालाजी लालपालवाले यांच्या फिर्यादीवरून भादंविचे कलम १७०, १७१, ४१७, ४१९ अन्वये रात्री ११.१५ वाजता गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक संतोष तोकलवाड करीत आहेत.
कुणाला फसविले? आयएएस अधिकारी असल्याचे भासविणाºया सुबोधने आणखी कुणाला फसविले, ही बाब त्याला एमसीआर मिळाल्यामुळे गुलदस्त्यातच राहिली आहे.