ट्रॅक्टरच्या सहाय्याने नदीपात्रातील वाळूची नियबाह्यरित्या अफरातफर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 10:55 AM2024-12-03T10:55:15+5:302024-12-03T10:56:15+5:30

शासकीय यंत्रणा अद्यापही अनभिज्ञच : केव्हा रोखणार गैरप्रकार

Improper removal of river sand by tractor | ट्रॅक्टरच्या सहाय्याने नदीपात्रातील वाळूची नियबाह्यरित्या अफरातफर

Improper removal of river sand by tractor

संदीप राऊत 
लोकमत न्यूज नेटवर्क 
तिवसाः
तालुक्यातील नदीपात्रातून चोरट्या मार्गाने अवैध वाळूची वाहतूक ही काही नवलाची बाब नाही. परंतु काही दिवसांपूर्वी याच अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा घालण्यात महसूल प्रशासनाला यश आले होते. व अवैध गौण खनिज वाहतुकीवर सर्वाधिक कारवाया करण्यात महसूल प्रशासनाने अव्वल स्थान गाठले होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील नदीपात्रातून बेधडकपणे अवैधरित्या वाळूची वाहतूक करण्यात येत आहे.


जवळपास दोन महिन्यांपासून शासकीय यंत्रणा विधानसभा निवडणूक कार्यात व्यस्त असल्याने वाळू चोरट्यांना रान मोकळे झाले होते. त्याचाच फायदा घेऊन वाळू चोरट्यांनी आपला मोर्चा वाळूघाटाकडे वळवून नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक सुरू केली. परंतु आता निवडणुकीचा हंगाम ओसरला आहे तेव्हा आतातरी शासकीय यंत्रणा या गैरप्रकाराकडे लक्ष देतील काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. 


तालुक्यातील नदीपात्रात अद्यापही मोठ्या प्रमाणात वाळूसाठा उपलब्ध आहे. तसेच वाळूचे दर गगनाला भिडले असल्यामुळे अवैध वाळू वाहतुकीतून झटपट माया गोळा करण्यासाठी रात्रीचा दिवस करून वाळू चोरट्यांकडून शहरासह ग्रामीण भागात चढ्या दराने वाळू विक्री करण्यात येत आहे. नदीपात्रातून दैनंदिन शेकडो ब्रास वाळूची अफरातफर होत असल्यामुळे शासनाच्या महसुलाची अक्षरशः लूट होत आहे. 


वाळूची अवैध वाहतूक रोखण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारे प्रतिबंध लावण्यात आले होते परंतु त्या खचखडग्यांवर मात करून वाळू चोरट्यांनी नदीपात्रात जाण्याचा मार्ग सुकर केला. व खुलेआम वाळू उत्खनन करून बेभानपणे वाळू वाहतूक सुरू करून एकप्रकारे शासकीय यंत्रणेलाच आवाहन दिल्याचे दिसून येत आहे. 


पोलिसांची कारवाई थंडावली 
वास्तविक पाहता अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीला चाप लावणे महसूल यंत्रणेचे काम आहे परंतु याबाबत पोलिस यंत्रणाही नेहमी सजग असते. मात्र, पोलिसांनीही या गैरप्रकाराकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.


"लवकरच बंदोबस्त करण्यात येईल. शासकीय यंत्रणा निवडणूक कार्यात व्यस्त असल्याचा फायदा वाळू चोरट्यांनी घेतला असेल परंतु यापुढे पाळत ठेवून चोरट्यांना आवर घालण्यात येईल." 
- मयूर कळसे, तहसीलदार तिवसा

Web Title: Improper removal of river sand by tractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.