निविष्ठा वाटप प्रणालीत सुधारणा करा
By admin | Published: June 10, 2016 12:21 AM2016-06-10T00:21:17+5:302016-06-10T00:21:17+5:30
कृषी विभागामार्फत विविध प्रकल्पांमध्ये व योजनांमध्ये वाटप करण्यात येणारा निविष्ठा परवाने वाटपातून देण्यात याव्यात.
वाटपावर बहिष्कार : राज्य कृषी सहायक संघटनेची मागणी
अमरावती : कृषी विभागामार्फत विविध प्रकल्पांमध्ये व योजनांमध्ये वाटप करण्यात येणारा निविष्ठा परवाने वाटपातून देण्यात याव्यात. या प्रणालीमध्ये सुधारणा न झाल्यास वाटपावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेद्वारा शासनाला दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.
कृषी विभागाच्या योजनांमधील लोकवाटा वसुलीचे काम कृषी सहायकांमार्फत करण्यात येते. त्यांच्याकडे आर्थिक वसुलीचे कोणतेच अधिकार नसताना व लोकवाटा वसुलीची कोणतीच शासकीय पावती लाभार्थी शेतकऱ्यांना न देता वरिष्ठ अधिकारी दबाबतंत्राचा वापर करून लोकवाटा वसूल करतात आणि कृषी सहायकांमार्फत विनापरवाना निविष्ठा वाटप करण्यात येतात, असा आरोप विनेदनात करण्यात आलेला आहे.
या निविष्ठा वाटप प्रणालीत सुधारणा करण्यासाठी तत्कालीन आयुक्त उमाकांत दांगट यांनी १६ सप्टेंबर २०१३ ला परिपत्रक जारी करून निविष्ठा वाटपासंदर्भात नियमावली संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी विभागाला दिली. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निविष्ठा वाटपाचे काम करणे कठीण झाले.
तसेच परवान्यावर अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असल्याने त्यांची जबाबदारी वाढली. परंतु या नियमाला बाजूला सारून विनापरवाना निविष्ठा वाटप करण्यात आले.
मागील वर्षी परवान्यावर निविष्ठा वाटप करण्यात आले, तर लोकवाटा विनापावती जमा करण्यात आला होता.
यंंदाच्या खरीप हंगामात निविष्ठा वाटप प्रणालीत सुधारणा न झाल्यास वाटपावर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा राज्य कृषी सहायक संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र पकडे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. (प्रतिनिधी)