योजनांमध्ये सुधारणा करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2019 05:00 AM2019-12-17T05:00:00+5:302019-12-17T05:00:07+5:30
विधान भवनातील मंत्रिपरिषद सभागृहात अमरावती जिल्ह्याच्या विविध विकासकामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आमदार यशोमती ठाकूर, सुलभा खोडके, बच्चू कडू, रवि राणा, देवेंद्र भुयार, राजकुमार पटेल, प्रताप अडसड, बळवंत वानखडे, मुख्य सचिव अजोय मेहता, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी संजय पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : नैसर्गिक संकटांवर मात करण्यासाठी प्रभावी उपाययोजनांसह सध्याच्या जलसंधारणासह विविध योजनांमध्ये लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन सुधारणा करण्याची ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी दिली.
विधान भवनातील मंत्रिपरिषद सभागृहात अमरावती जिल्ह्याच्या विविध विकासकामांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी आमदार यशोमती ठाकूर, सुलभा खोडके, बच्चू कडू, रवि राणा, देवेंद्र भुयार, राजकुमार पटेल, प्रताप अडसड, बळवंत वानखडे, मुख्य सचिव अजोय मेहता, विभागीय आयुक्त पीयूष सिंह, जिल्हाधिकारी संजय पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे आदी उपस्थित होते.
सध्या अस्तित्वात असलेल्या योजनांमध्ये नव्या उपाययोजनांचा समावेश करावा लागेल. त्यासाठी लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन नव्या योजनांची भर घालण्यात येईल. अवेळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विम्याचा आधार असतो. त्यामुळे विमा धोरणात सुधारणा करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अवेळी पावसाने बाधित झालेल्या जाहीर क्षेत्रात वरूड, मोर्शी या तालुक्यांचा समावेश नसल्याची बाब समोर आल्यानंतर, ही बाब जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून शासकीय नियमाप्रमाणे मदत करण्यात येईल, असे मेहता यांनी सांगितले. वन्यप्राण्यांमुळे होणाºया अपघातानंतर मदतीच्या निकषांमध्ये रोही (नीलगाय) या प्राण्याचा समावेश करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. कृषी विभागातील ४७ पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात मृद् व जलसंधारणाच्या १०५ योजना पूर्ण होऊन २८ हजार ५९४ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. जिल्ह्यात जलशक्ती अभियानात चांदूर बाजार, अचलपूर, मोर्शी व वरूड तालुक्यात ३,६५३ छतांवरील पाणी संकलन योजना पूर्ण झाल्या. रोहयोत जलसंधारण प्रकारातील २४,४९५ कामे हाती घेण्यात आली. त्यातील १६,६७८ कामे पूर्ण झाल्याची माहिती अधिकाºयांनी दिली. जिल्ह्यातील विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.
जिल्हाधिकाऱ्यांद्वारे कामांचे सादरीकरण
जिल्ह्यात २०१९ मध्ये खरीपाचे क्षेत्र ६ लाख ८२ हजार हेक्टर व प्रत्यक्ष पडलेला पाऊस ७७८.८४ मिमी होता. अवेळी पावसाने ३ लाख ७३ हजार ५५० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले, तर बाधित शेतकऱ्यांची संख्या ३ लाख ७५ हजार ३९८ आहे. ऑक्टोबरमधील अवेळी पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने ९१ हजार २७८ शेतक-यांना ७२ कोटी २६ लाख अनुदान वाटप करण्यात आले. जिल्ह्याला २३० कोटी ६२ लाख रुपयांचे अनुदान वाटप होत असल्याची माहिती जिल्हाधिकारी संजय पवार यांनी दिली.