रागाच्या भरात खाली आपटून पोटावर मारल्या लाथा; ५८ वर्षीय गृहस्थाचा आतडी फुटून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2022 08:02 PM2022-05-30T20:02:43+5:302022-05-30T20:03:13+5:30
Amravati News दोन्ही हातांनी उचलून खाली आपटून पोटावर लत्ताप्रहार केल्याने बैजू सूर्यभानजी सिराम (५८, रा.आदिवासीनगर) यांचा मृत्यू झाला.
अमरावती : दोन्ही हातांनी उचलून खाली आपटून पोटावर लत्ताप्रहार केल्याने बैजू सूर्यभानजी सिराम (५८, रा.आदिवासीनगर) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तेथीलच राजेश मारुती उईके (३८) याच्याविरुद्ध शहर कोतवाली पोलिसांनी भादंविचे कलम ३०४ (सदोष मनुष्यवध) अन्वये गुन्हा दाखल केला. १३ मे रोजी रात्री १०.३० ते ११च्या सुमारास हॉटेल महफीलच्या मागे असलेल्या आदिवासीनगरमध्ये ही घटना घडली होती. या प्रकरणी २९ मे रोजी सकाळी ९.२९ वाजता गुन्हा नोंदविण्यात आला.
तक्रारीनुसार, १३ मे रोजी रात्री १०.३० च्या सुमारास आदिवासीनगरमध्ये राहणारे बैजू सूर्यभानजी सिराम व मारोती उईके यांच्यात वाद सुरू होता. तेवढ्यात मारुती उईकेचा मुलगा राजेश हा घराबाहेर आला. त्याने बैजू सिराम यांना त्यांच्याच घरासमोर दोन्ही हातांनी उचलून खाली आपटले. त्यांच्या पोटावर लाथा मारल्या. त्यामुळे त्यांना पोटात प्रचंड त्रास झाला. दरम्यान, त्यांना गंभीर अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. १४ मे रोजी सायंकाळी ६.४५च्या सुमारास त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वैद्यकीय अहवालानुसार, राजेश उईके याने बैजू सिराम यांच्या पोटावर लत्ताप्रहार केल्याने, त्यांचे लहान आतडे फुटून त्यामधून तब्बल ३ लीटर रक्तस्राव झाला. शवविच्छेदन अहवालात त्यांच्या मृत्यूचे कारण ‘हॅमरेज अँड शाॅक ड्यू टू इंज्युरी सस्टेन’ असे नमूद करण्यात आले आहे.
बैजू सिराम हे दारू पिण्याच्या सवयीचे आहेत, हे माहीत असूनही राजेश उईके याने त्यांना खाली आपटले. पोटावर लाथा मारल्या. त्यामुळे तोच बैजू सिराम यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा अहवाल तपास अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक सुमेध सोनोने यांनी शहर कोतवालीच्या ठाणेदारांना दिला. त्या लेखी चाैकशी अहवालाच्या आधारे राजेश उईकेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पूजा खांडेकर करीत आहेत.
शवविच्छेदन अहवाल व तपासी अधिकाऱ्याच्या लेखी चौकशी अहवालाअंती आरोपीविरुद्ध कलम ३०४ अन्वये गुन्हा नोंदविला. १३ मे रोजी आदिवासीनगरमध्ये ती घटना घडली होती.
- भारत गायकवाड, सहायक पोलीस आयुक्त.