धक्कादायक! अमरावती जिल्ह्यात वर्षात १०१९ बालकांचा मृत्यू, ३५ माता दगावल्या
By उज्वल भालेकर | Published: June 8, 2024 09:35 PM2024-06-08T21:35:29+5:302024-06-08T21:35:53+5:30
वर्षभरात ३२ हजार ३९४ बालकांचा झाला जन्म, ४८१ उपजत मृत्यू
अमरावती : जिल्ह्यातील बालमृत्यू आणि कुपोषण अजूनही तितकेच गंभीर असल्याचे आरोग्य विभागाकडून प्राप्त आकडेवारीवरून स्पष्ट होते. २०२३-२४ या एक वर्षाच्या कालावधीमध्ये जिल्ह्यात १०१९ बालकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सर्वाधिक ४८१ मृत्यू हे उपजत असून, आरोग्य विभागाकडून उपजत मृत्यू रोखण्यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात वर्षभरात ३२ हजार ३९४ बालकांचा जन्म झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
जिल्ह्यातील कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण थांबविण्यासाठी राज्य शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. विविध सामाजिक संस्थांनाही कुपोषण व बालमृत्यू रोखण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पुरविला जातो. तरीही जिल्ह्यातील बालमृत्यूचे चक्र थांबलेले नाही. जिल्ह्यात रोज सरासरी दोन बालकांचा मृत्यू होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. आजही मेळघाटातील नागरिकांना आरोग्याच्या अपुऱ्या सोयी-सुविधा असल्याने अनेक गंभीर बालकांना अमरावती येथे जिल्हा स्त्री रुग्णालयात रेफर करण्याचे प्रमाण अधिक आहे.
मेळघाटातील आरोग्य व्यवस्था सुधारण्याचे प्रत्येक वेळी आश्वासन मिळते. परंतु, प्रत्यक्षात कोणतीही ठोस उपाययोजना राबविण्यात येत नसल्याचे सामाजिक संघटनांचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक बालमृत्यू, उपजत मृत्यू तसेच मातामृत्यूचे प्रमाण हे मेळघाटातील आदिवासी क्षेत्रातील आहे.
३५ माताही दगावल्या
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात वर्षभरात ३५ मातांचा प्रसूतीदरम्यान मृत्यू झाला आहे. यामध्ये मेळघाटातील मातांची संख्या अधिक आहे. वेळीच उपचाराच्या सुविधा न मिळणे तसेच प्रसूतीदरम्यान जास्त रक्तस्राव होणे, शरीरात हिमोग्लोबीन कमतरता, गर्भधारण काळात योग्य आहार न मिळणे अशी अनेक कारणे माता मृत्यूला जबाबदार आहेत.
वर्षभरात ३२१६४ महिलांची प्रसूती
जिल्ह्यात २०२३-२४ या एक वर्षाच्या कालावधीमध्ये १७ हजार ७६४ नैसर्गिक, तर १४ हजार ४०० प्रसूती ही सिझेरियन असे एकूण ३२ हजार १६४ महिलांची प्रसूती झाली. यामध्ये ३२ हजार ३९४ बालकांचा जन्म झाला असून, १६ हजार ८२६ मुले, तर १५ हजार ५६८ मुलींचा जन्म झाला आहे.
ठोस उपाययोजनांची आवश्यकता
मेळघाटातील बालमृत्यू व माता मृत्यू रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याची गरज आहे. शासनाने येथील अतिदुर्गम भागातील गावांमध्ये आरोग्याच्या सोयी-सुविधा पोहोेचविण्यासाठी विशेष भर देण्याची गरज आहे. येथील काही दुर्गम भागात आरोग्य उपकेंद्र बंद अवस्थेत असल्याचेच चित्र पाहायला मिळते. तसेच येथील आदिवासींमध्ये प्रसूतीसाठी रुग्णालयात येण्यासाठी समुपदेशन आवश्यक असून, मेळघाटात आरोग्य सुविधा वाढवून येथील रेफरचे प्रमाणही थांबविणे गरजेचे आहे.
वर्षभरातील बाल मृत्यू व माता मृत्यूची आकडेवारी
उजपत मृत्यू : ४८१
० ते १ वर्ष अर्भक मृत्यू : ४७६
१ ते ५ वर्षे बालमृत्यू : ६२
मातामृत्यू : ३५
एकूण मृत्यू : १ हजार ५४