माता न तू वैरिणी; दुधातून दिले चिमुकलीला विष!

By प्रदीप भाकरे | Published: May 24, 2023 02:23 PM2023-05-24T14:23:05+5:302023-05-24T14:23:34+5:30

आईविरूद्ध खुनाचा गुन्हा : अक्षराची मृत्युशी झुंज अयशस्वी 

in amravati mother poisoned 11 year old daughter from milk, girl dies | माता न तू वैरिणी; दुधातून दिले चिमुकलीला विष!

माता न तू वैरिणी; दुधातून दिले चिमुकलीला विष!

googlenewsNext

अमरावती : चक्क आईने दुधातून दिलेले विष विश्वासाने पिणाऱ्या ११ वर्षीय चिमुकलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ११ मे रोजी मृत्यूशी सुरू झालेली तिची झुंज १९ मे रोजी सायंकाळी नागपुरातील मेडिकल कॉलेजमध्ये संपुष्टात आली. चिमुकलीच्या मृत्युनंतर तिला दुधातून विष देणाऱ्या तिच्या आईविरूद्ध कुऱ्हा पोलिसांनी २३ मे रोजी रात्री ११ च्या सुमारास खून, खुनाचा प्रयत्न तथा आत्महत्येचा प्रयत्न आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तिला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

मुलांचा बाप असताना आपल्यानंतर कोण, असा विचार करून मुलांना विष पाजणाऱ्या प्रिया हिच्याबाबत समाजात माता न तू वैरिणी’ अशी प्रतिक्रिया उमटली आहे. अक्षरा अमोल जयसिंगकार (११, रा. अंजनसिंगी) असे मृत चिमुकलीचे नाव आहे. आपल्याला पोटाचा त्रास असल्याने आपल्या मृत्युनंतर मुलांचे काय होणार, या भीतीपोटी आपण अक्षरा व लहानग्या मुलाला बोर्नव्हिटा टाकलेल्या दुधात विष कालवले होते. ते विषयुक्त दुध दोन्ही मुलांना देऊन स्वत: देखील घेतल्याची कबुली अक्षराची आई प्रिया अमोल जयसिंगकार (२८, रा. अंजनसिंगी) हिने कुऱ्हा पोलिसांना दिली आहे. ११ मे रोजी सकाळी ९.४५ वाजताच्या सुमारास अंजनसिंगी येथे ती धक्कादायक घटना घडली होती. घटनेवेळी चिमुकल्यांचे वडिल अमोल जयसिंगकार हे कामासाठी घराबाहेर गेले होते.

काय घडले नेमके?

रोजप्रमाणे आईच्याच हातचे दुध घेऊन त्या चिमुकल्यांची पहाट व्हायची. नेहमीप्रमाणे अक्षरा व जय (७) यांनी ११ मे रोजी सकाळी ९.४५ च्या सुमारास आईकडून दूध घेतले. मात्र त्यादिवशी प्रिया हिने मुलांना बोर्वव्हिटा घातलेल्या दुधात उंदिर मारण्याचे विषारी औषध मिसळविले. ते दूध मुलांना प्यायला दिले. स्वत:देखील घेतले. हा प्रकार शेजाऱ्यांना माहिती होताच त्यांनी तिघा मायलेकांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात हुलविले. तेथे प्रिया जयसिंगकार व अक्षराचे बयान देखील झाले.

नागपूरला हलविले

सुरुवातीला अक्षराच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. मात्र दोन दिवसांनी तिची प्रकृती बिघडल्याने तिला नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले. मात्र आईने दुधातून दिलेले विष सर्वांगात भिनल्याने ती उपाचारास दाद देऊ शकली नाही. परिणामी, १९ मे रोजी सायंकाळी ६.३० च्या सुमारास अक्षराने तेथे शेवटचा श्वास घेतला. त्याबाबत कुऱ्हा पोलिसांना माहिती देण्यात आली.

असा आहे प्रियावरील आरोप

आपल्याला पोटाचा असह्य त्रास होत असल्याने आपल्या मृत्युनंतर मुलांचे काय होईल, या भीतीपोटी आपण ते कृत्य केल्याचे प्रिया हिचे बयाण आहे. तर, ११ मे रोजी अक्षरा हिचे देखील बयान नोंदविण्यात आले होते. विषयुक्त दुध पिण्यास दिल्याने मुलांचा जीव जाऊ शकतो, याची जाणीव असताना देखील तिने मुलांना विष दिल्याने व स्वत:ही घेतल्याने तिच्याविरूद्ध मुलीचा खून, चिमुकल्या जयच्या खुनाचा प्रयत्न व स्वत: आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.

Web Title: in amravati mother poisoned 11 year old daughter from milk, girl dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.