अमरावती विद्यापीठात अधिष्ठाता पदभरतीतून आरक्षणाचा ‘बिंदू’ गायब, अखेर 'ती' जाहिरात रद्द
By गणेश वासनिक | Published: December 3, 2024 09:51 PM2024-12-03T21:51:20+5:302024-12-03T21:53:18+5:30
दोन डिन पदभरतीची काढली होती जाहिरात, सिनेटमध्ये ठराव घेत आरक्षण पूर्ववत
गणेश वासनिक, अमरावती: आरक्षणावरून राजकीय व सामाजिक क्षेत्रात घमासान सुरु असताना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अधिष्ठाता पदभरतीतून आरक्षणाचा ‘बिंदू’ गायब केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी सिनेट सभेत उघडकीस आला आहे. विद्यापीठातील दाेन अधिष्ठाता पदभरतीत खुला व ओबीसी संवर्गासाठी आरक्षण निश्चित करताना त्याचा केंद्रबिंदू ठरविण्यात आला नसल्याचा आराेप सदस्यांनी पुराव्यांनिशी केला. या मुद्यावरून चांगलेच घमासान झाल्यानंतर विद्यापीठाने प्रसिद्ध केलेली पदभरतीची जाहिरात अखेर रद्द केली असून नव्याने पदभरती हाेणार आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने ९ सप्टेंबर २०२४ राेजी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा आणि मानव विज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदासाठी आरक्षण निर्धारण करून जाहिरात प्रकाशित केली हाेती. परंतु आरक्षण निश्चित करताना विद्याशाखेच्या काेणत्या संवर्गासाठी आरक्षण निश्चित करण्यात आले ही बाब स्पष्ट करण्यात आली नव्हती. खुला व ओबीसी संवर्गासाठी पदे असल्याचे स्पष्ट असले तरी यामुळे एससी संवर्गावर अन्याय झाल्याचा मुद्दा मंगळवारी विद्यापीठाच्या अधिसभेत उघडकीस आणला. सिनेट सदस्य डाॅ. सुभाष गवई यांनी प्रश्नाेत्तराच्या तासात ‘पाॅईट ऑफ ऑर्डर’द्वारा ही बाब सभागृहापुढे मांडली.
विद्यापीठाने अधिष्ठातापदासाठी अर्ज मागविले आहेत परंतु काेणत्या विद्याशाखेसाठी काेणत्या संवर्गातील उमेदवाराने अर्ज करायचे याची गल्लत झाली आहे. अधिष्ठाता पूर्णवेळ अधिकारी असून त्याजागी शिक्षक कार्य करू शकत नाही. आरक्षणाचा बिंदू केंद्रीत नाही. काेणत्या पदासाठी काेणते आरक्षण ही बाब पुरेशी स्पष्ट नाही. त्यामुळे विज्ञान शाखेतील पारंगत उमेदवाराने नेमका मानव विज्ञान शाखेसाठी अर्ज करायचा का? असा प्रश्न डॉ. सुभाष गवई यांनी केला. उमेदवार संभ्रमित असून अनेकजण आरक्षणात बसत असतानाही त्यांनी अर्ज केले नसल्याची बाब त्यांनी मांडली. यासाठी चार सदस्यीय समिती गठीत करून संपूर्ण प्रकरणाची चाैकशी करावी, अशी बाजू त्यांनी मांडली. यावेळी डाॅ. संताेष बनसाेड यांनी या संपूर्ण प्रकरणात एससी संवर्गाचे आरक्षण पुढे आले नसल्याचे म्हटले. हा संपूर्ण प्रकार गंभीर असल्याने याप्रकरणाची चाैकशी करावी, अशी मागणी डाॅ. सुभाष गवई यांनी केली.
डाॅ. गवई यांनी यावेळी चार सदस्यीय समिती गठीत करण्याची सूचना केली. पीठासीन सभापती व कुलगुरु डाॅ. मिलिंद बारहाते यांनी शासनाच्या निर्णयांनुसार पदभरतीसाठी जाहिरात प्रकाशित केल्याचे सांगितले. परंतु पदभरती बाबत संभ्रम व सदाेष नसल्याने नव्याने जाहिरात प्रकाशित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय याप्रकरणाची चाैकशी करण्यासाठी सिनेट सदस्य डाॅ. प्रवीण रघुवंशी यांच्या अध्यक्षतेत समिती गठीत करण्याचे त्यांनी जाहीर केले.