अमरावती जिल्हा परिषदेत 'एक दिवस तिच्यासाठी' उपक्रम, अधिकारी, कर्मचाऱ्यांचा निराधार, दिव्यांग, विधवा महिलांना मदतीचा हात
By जितेंद्र दखने | Published: November 6, 2023 06:11 PM2023-11-06T18:11:45+5:302023-11-06T18:12:58+5:30
Amravati News: दिवाळीसारख्या आनंदाच्या सणापासून एखादी गरीब, निराश्रित महिला वंचित राहू नये, यासाठी खुद्द जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. कुठलाही शासनादेश नसतानासुद्धा केवळ सामाजिक बांधिलकी जोपासत अमरावती जिल्हा परिषदेकडून यंदा 'एक दिवस तिच्या’साठी हा उपक्रम राबविला जाणार आहे.
- जितेंद्र दखने
अमरावती - दिवाळीसारख्या आनंदाच्या सणापासून एखादी गरीब, निराश्रित महिला वंचित राहू नये, यासाठी खुद्द जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे. कुठलाही शासनादेश नसतानासुद्धा केवळ सामाजिक बांधिलकी जोपासत अमरावती जिल्हा परिषदेकडून यंदा 'एक दिवस तिच्या’साठी हा उपक्रम राबविला जाणार आहे. विशेष म्हणजे विदर्भात अमरावती जिल्हा परिषद ही अशा प्रकारचा उपक्रम राबविणारी बहुधा पहिलीची जिल्हा परिषद ठरणार आहे.
कर्मचाऱ्यांचे वेतन, पेन्शन व इतर हक्कांसाठी लढा देणाऱ्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या संघटनेनेसुद्धा या उपक्रमासाठी सहकार्याचा हात पुढे केला आहे. दिवाळी म्हणजे आनंदाच सण, मात्र आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या तसेच निराधारांना दिवाळीचा आनंद लुटता येत नाही, त्यांनासुद्धा या सणाचा आनंद मिळावा, यासाठी ‘एक दिवस तिच्या’साठी हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत गावातील गरीब, निराधार महिलेची निवड करून अंगणवाडी सेविकांमार्फत तिला साडी - चोळीचा अहेर, दिवाळीचा फराळ, तिच्या मुलांसाठी फटाके, दिवे आदी साहित्याचे किट दिले जाणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जाणार आहे. सीईओंच्या या अनोख्या उपक्रमासाठी हातभार लागावा म्हणून जिल्हा परिषदेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ऐच्छिक रक्कम जमा केली असून, त्या रकमेतून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील निराधार, अपंग, विधवा महिलेला दिवाळीची भेट दिली जाणार आहे.
हा उपक्रम सामाजिक भावनेतून राबविण्यात येणार असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून ऐच्छिक सहकार्य घेतले जाणार आहे. समाजाचा एक जबाबदार घटक म्हणून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यामध्ये पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- अविश्यांत पंडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.