बडनेरात जय हनुमानच्या गजरात एकट्या भक्तांने ओढल्या भरगच्च नऊ बंड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2023 12:08 PM2023-04-07T12:08:42+5:302023-04-07T12:09:19+5:30
६१ वर्षांपासूनची परंपरा जोपासली
बडनेरा (अमरावती) : एकट्या हनुमान भक्ताने जवळपास पाचशे मीटर अंतरापर्यंत भक्तांनी भरगच्च भरलेल्या नऊ बंड्या ओढल्या. हनुमान जन्माच्या दिवशी जुन्यावस्तीतील बारीपुरा स्थित हनुमान मंदिराच्या वतीने ६१ वर्षांपासून ही परंपरा जोपासली जात आहे. हा उत्सव पाहण्यासाठी हनुमान भक्तांची याठिकाणी एकच गर्दी जमली होती. यंदा गुरुवारी सायंकाळी नव्या भक्ताने गाड्या ओढल्या, हे विशेष.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बारीपुऱ्यातील हनुमान मंदिराच्या वतीने हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता एकटा हनुमान भक्त पाचशे मीटर अंतरापर्यंत भक्ताने भरगच्च भरलेल्या नऊ बंड्या ओढल्या. ही परंपरा बारीपुरा परिसरात राहणाऱ्या रूपराव जाट नामक हनुमान भक्ताने सुरू केली. तेव्हापासून ही परंपरा येथे निरंतर सुरू आहे.
मोठ्या संख्येत हनुमान भक्त बंड्यांवर बसलेले हाेते. सर्वांच्या हातात भगवे झेंडे होते. 'जय हनुमान' 'जय श्रीराम'च्या गजरात हनुमान भक्त गाड्या ओढत अवघ्या काही वेळातच हनुमान मंदिरापर्यंत पोहोचला. यावेळी परिसर हनुमानाच्या गजराने दुमदुमून गेला होता. बडनेरा शहरासह परिसरातील खेड्यांवरील लोक हा धार्मिक उत्सव पाहण्यासाठी येथे मोठ्या संख्येत आले होते. कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. त्याचप्रमाणे संस्थानच्या वतीनेदेखील याची खबरदारी घेण्यात आली.
हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी गुरुवारी पहाटे हनुमान जन्मोत्सव साजरा झाला. त्यानंतर सकाळी सात वाजता शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. साडेनऊ वाजता गोपाल काल्याचे कीर्तन झाले. दुपारी भव्य महाप्रसाद होता. एक हनुमान भक्त सलग पाच वर्षांपर्यंत गाड्या ओढत असून, हीच परंपरा पूर्वीपासून येथे सुरू आहे.