बहिरम येथे शेतकऱ्यांनी कापूस पेटवून केला केंद्र सरकारचा निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2023 11:17 AM2023-01-25T11:17:57+5:302023-01-25T11:18:11+5:30
शेतमालाला भाव द्या; व्यापारीधार्जिणे धोरण संपवा
परतवाडा (अमरावती) : १९७५ च्या बहिरम कापूसआंदोलनाची ज्योत कायम ठेवण्याकरिता आणि शेतकरीविरोधी केंद्र सरकारच्या धोरणांचा विरोध करण्याकरिता मंगळवारला शेतकऱ्यांनी बहिरम येथे कापूस पेटविला.
प्रकाश साबळे व गोपाल भालेराव यांच्या नेतृत्वात बहिरम कापूस आंदोलन स्मृती समितीने २४ जानेवारी १९७५ ला बहिराम कापूस आंदोलनात शहीद झालेले शेतकरी विठ्ठलराव दोतोंडे आणि त्यादरम्यानचे प्रेरणादायी ठरलेले नेतृत्व दादासाहेब हावरे, भाऊ साबळे, केशरबाई सिकची, शंकरराव बोबडे, मामराजजी खंडेलवाल, विनायकराव कोरडे, वामनराव खलोकर यांना मंगळवारी श्रद्धांजली वाहली. शहीद शेतकरी स्मृती श्रद्धांजली दिन पाळला. बहिरम येथील रेस्ट हाऊस परिसरात पार पडलेल्या या कार्यक्रमाला जवळपास २०० शेतकऱ्यांनी हजेरी लावली. श्रद्धांजलीपर कार्यक्रम आटोपल्यानंतर या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध म्हणून कापूस पेटविला.
डोक्यावर कापसाचे गाठोडे....
शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कापसाचे गाठोडे आणि हातातील फलक अधिक बोलके ठरलेत. कापसाला भाव मिळालाच पाहिजे, किसान एकता जिंदाबादचे गगनभेदी नारेही आंदोलकांनी लावलेत. शेतकऱ्यांच्या सोयाबीन, तुरीलाही भाव मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना मदत मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, हे नारे लावत त्यांनी केंद्र सरकारचा कापूस उत्पादक धोरणाचा निषेधही याप्रसंगी नोंदविला.