इर्विनमध्ये वापरल्याविनाच २० आयसीयू बेड झाले खराब !
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2024 12:59 PM2024-05-24T12:59:59+5:302024-05-24T13:00:37+5:30
Amravati : कोविडच्या लाखो रुपयांच्या निधीतून खरेदी केले होते ६३ आयसीयू बेड
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) येथे वापरात नसलेले आयसीयू बेड खराब होण्याच्या मार्गावर आहे. या बेडवरील फोमची गादी खराब झाली असून रुग्णालय प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे या आयसीयू बेड खरेदीसाठी केलेला लाखो रुपयांचा खर्च वाया गेला का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय येथे कोविड काळात कोट्यवधी रुपयांचा निधी हा केंद्र शासनाकडून मिळाला होता. परंतु २०२२ मध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने शासनाकडून प्राप्त निधी हा रुग्णालयातील इतर आवश्यक सोयी सुविधांवर खर्च करण्याची परवानगी रुग्णालय प्रशासनाला मिळाली होती. त्यामुळे याच लाखो रुपयांच्या निधीतून इर्विन रुग्णालयासाठी ६३ आयसीयू बेड खरेदी केले होते. यामध्ये ४२ आयसीयू तर २१ पेडियाट्रिक आयसीयू बेड आहेत.
त्यामुळे लवकरच रुग्णालयातील ६ बेडचे आयसीयू विभाग ६३ बेडचे होणार असल्याचे बोलल्या जात होते. परंतु प्रत्यक्षात तसे झाले नाही. तर रुग्णालय प्रशासनाने तयार केलेले ४ आयसीयू बेड आयसीयू बेड हे वॉर्ड क्र. ६, ५, ८ तसेच वॉर्ड क्र. १० मध्ये रुग्णांच्या सर्वसाधारण रुग्णांसाठी वापरात आणले होते. तर २० च्या जवळपास बेड हे वापरात नसल्याने ते रुग्णालय परिसरातच रुग्णांच्या नातेवाइकांसाठी असलेल्या भोजन कक्षामध्ये ठेवले होते. मागील दोन वर्षांपासून हे बेड वापरात नसल्याने या बेडवरील फोमची गादी उंदरांनी कुरतडली असून काही गाद्या या पाण्यामुळे खराब झाल्या आहेत. तर बेडही खराब होण्याच्या मार्गावर आहेत.