मेळघाटात चारचाकी दीडशे फूट दरीत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2022 10:28 PM2022-08-03T22:28:35+5:302022-08-03T22:29:21+5:30
Amravati News अकोट येथून मेळघाटच्या धारणी तालुक्यातील आदिवासी भागातील बाजारांमध्ये भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांचे चारचाकी वाहन राणीगावनजीक दीडशे फूट दरीत कोसळले.
अमरावती: अकोट येथून मेळघाटच्या धारणी तालुक्यातील आदिवासी भागातील बाजारांमध्ये भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांचे चारचाकी वाहन राणीगावनजीक दीडशे फूट दरीत कोसळले. यामध्ये चार ठार, तर आठ जण गंभीर झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी सात वाजताच्या दरम्यान घडली. गंभीर जखमींना धारणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सूत्रांनुसार, चालक केशव शिवाजी बनसोड (रा. अडगाव), सय्यद समशेर (रा. अकोट) अशी मृतांची नावे आहेत, तर अन्य दोन मृतांची नावे पुढे आलेली नाहीत. धारणी उपजिल्हा रुग्णालयात जखमी शरीफ खान सरदार खान रेडिमेड वाले (३८), जरीफ खान शब्बीर खान चाबीवाले (३२), प्रफुल हरोडे ऊर्फ पिंटू (५०), समीर बेग अकबर बेग (३५), श्रीकृष्ण श्यामराव कोथडकर (४७), सय्यद जाफर (४०, सर्व रा. अकोट व हिवरखेड) यांच्यावर उपचार सुरू आहेत.
धारणी तालुक्यातील सुसर्दा येथे बुधवारी आठवडी बाजार होता. त्यासाठी नेहमीप्रमाणे अकोट हिवरखेड परिसरातील भाजीपाला विक्रेते मिनीडोरने आले होते. बाजार आटोपून सायंकाळी परत जात असताना राणीगावनंतर असलेल्या जंगलातील घाटवळणाच्या उतार रस्त्यावर एमएच ३० एबी १५३८ क्रमांकाच्या या वाहनाला भीषण अपघात झाला. ते उसळून एका झाडाला अडकले. त्यात दोघांचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर दोघांना धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ नेत असताना मृत्यू झाला. जखमी व्यापाऱ्यांवर धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्या गंभीर जखमींना स्थानिक नागरिकांसह वहीद नामक सामाजिक कार्यकर्त्याच्या मदतीने अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढण्यात आले.
व्याघ्र प्रकल्पाच्या नाक्याने वाढला वाहनवेग
अकोट, हिवरखेड, अडगाव या परिसरातून किरकोळ भाजीविक्रेते सुसर्दा येथील आठवडी बाजारासाठी आले होते. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत धूळघाट रेल्वे येथील नाका सायंकाळी सहा वाजता बंद होतो. त्यानंतर कुठलेच वाहन सोडले जात नाही. यामुळे चालकाने भरधाव नेलेले वाहन अनियंत्रित होऊन राणीगावनजीकच्या उतार वळणावरील दीडशे फूट दरीत कोसळले.
अपघातात दोन मृतांची माहिती मिळाली आहे. घटनास्थळी पोलीस कर्मचारी रवाना झाले आहेत. साधारणत: ७ ते ९ जण जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. नावे अप्राप्त आहेत.
- सुरेंद्र बेलखेडे, ठाणेदार, धारणी