मेळघाट व्याघ्र प्रकल्पात २१ वाघांसह बिबट, अस्वल, रानगवा, चितळाचेही दर्शन
By गणेश वासनिक | Published: May 8, 2023 05:40 PM2023-05-08T17:40:45+5:302023-05-08T17:43:12+5:30
Amravati News मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत दरवर्षीप्रमाणे यंदा ५ मे राेजी बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात निसर्गाच्या सान्निध्यात निसर्गप्रेमींसाठी 'निसर्ग अनुभव' हा उपक्रम राबविण्यात आला.
गणेश वासनिक
अमरावती : मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत दरवर्षीप्रमाणे यंदा ५ मे राेजी बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात निसर्गाच्या सान्निध्यात निसर्गप्रेमींसाठी 'निसर्ग अनुभव' हा उपक्रम राबविण्यात आला. २४ तास घनदाट १४० मचाणीहून पाणवठ्यावर २१ वाघांसह बिबट, अस्वल, रानगवा, चितळ, सांबर, नीलगाय, उदमांजर आदी वन्यप्राण्यांचे निसर्गप्रेमींना दर्शन झाले असून, प्रत्यक्षात बघता आले.
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातंर्गत सिपना, अकोट, गुगामल, मेळघाट वन्यजीव विभाग तर अकोला, पांढरकसहा वन्यजीव विभागामध्ये निसर्गप्रेमींना ऑनलाईन पद्धतीने मचाण आरक्षित करून 'निसर्ग अनुभव' या उपक्रमात सहभागी होता आले. यात पुणे, मुंबई, नाशिक, हैदराबाद, छत्रपती संभाजीनगर, ठाणे, नागपूर व नंदुरबार येथील १४० निसर्गप्रेमींची उपस्थिती होती. या उपक्रमात जेवण, नाश्ता, पाणी, मचाणीवर नेे -आण करण्यासाठी वाहन, कॅप आणि मेळघाट पुस्तिका निसर्गप्रेमींना देण्यात आली होती.
दरम्यान वन्यप्राणी नोंद पत्रक सुद्धा देण्यात आली होती. रात्रीच्या वनातील निरामय संगीत, प्राण्यांचे आवाज, रातकिड्यांची किरकिर, हवेची मंद झुळूक, जंगलातील शांतता तसेच पाणवठ्यावर प्रत्यक्ष पाणी पिण्यासाठी येणाऱ्या प्राण्यांचे दर्शन निसर्गप्रेमींना झाले. वाघ पाणवठ्यावर कसा रुबाबाने पाणी पितो, हा क्षण निसर्गप्रेमींसाठी अवस्मरणीय ठरला. 'निसर्ग अनुभव' हा उपक्रम मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक जयोती बॅनर्जी, उपवनसंरक्षक़ जयकुमारन, सुमंत सोळंके, दिव्या भारती, किरण जगताप, निमजे, मनोजकुमार खैरनार आदींनी सहभाग घेतला होता.
बुद्ध पौर्णिमेला १४० मचाणीहून 'निसर्ग अनुभव' हा उपक्रम राबविला गेला. यात २१ वाघांची नोंद झाली असून, बिबट, अस्वल, रानगवा, चितळ आदी वन्यप्राणी निसर्ग प्रेमींना बघता आले. त्यामुळे मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वन्यजीवांची संख्या अधिक
असल्याचे स्पष्ट होते.
- एम. एन. खैरनार, विभागीय वनाधिकारी, मेळघाट व्याघ्र प्रकल्प