जिल्ह्यातील आठपैकी सात मतदार संघात महायुतीनं मैदान मारलं... महाविकास आघाडीला केवळ एक जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 11:18 AM2024-11-24T11:18:13+5:302024-11-24T11:20:17+5:30

Amravati Assembly Vidhan Sabha Election 2024 Results Winning Candidates : तिवसा, मोर्शी, अचलपूर, मेळघाट, धामणगाव भाजपला, बडनेरात युवा स्वाभिमान, अमरावतीत राष्ट्रवादी अजित पवार गट विजयी, दर्यापुरात उद्धवसेनेने राखला गड

In seven out of eight constituencies in the district, Mahayuti won ground... Only one seat for Mahavikas Aghadi | जिल्ह्यातील आठपैकी सात मतदार संघात महायुतीनं मैदान मारलं... महाविकास आघाडीला केवळ एक जागा

In seven out of eight constituencies in the district, Mahayuti won ground... Only one seat for Mahavikas Aghadi

लोकमत न्यूज नेटवर्क 
अमरावती :
सर्व राजकीय निरीक्षक अन् एक्झिट पोलचे अंदाज फोल ठरवीत जिल्ह्यात महायुतीने इतिहास रचला. आठपैकी सात मतदारसंघांत शानदार विजय प्राप्त केला. यामध्ये पाच मतदारसंघांत भाजप, युवा स्वाभिमान व राष्ट्रवादी अजित पवार गट व काँग्रेसने प्रत्येकी एक मतदारसंघ कायम राखला आहे. महायुतीला सात, तर महाविकास आघाडीला फक्त एका मतदारसंघात विजय प्राप्त करता आला.


या त्सुनामीमध्ये बच्चू कडू, यशोमती ठाकूर, वीरेंद्र जगताप, डॉ. सुनील देशमुख, राजकुमार पटेल आदी दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला, तर राजेश वानखडे, प्रवीण तायडे, उमेश यावलकर, गजानन लवटे हे पहिल्यांदा विधानसभेच्या सभागृहात एंट्री करणार आहेत. तिवसा, अमरावती, अचलपूर मतदारसंघातील प्रत्येक फेरी ही उत्कंठा वाढविणारी ठरली. अमरावती मतदारसंघात आझाद समाज पार्टीच्या डॉ. अलीम पटेल यांनी अनपेक्षितपणे सर्वांचे हार्ट बिट वाढविले. सुलभा खोडके यांनी पहिल्या फेरीपासून घेतलेले लीड मोडीत काढून पटेल यांनी सर्वांना घाम फोडला होता, आठव्या फेरीपासून पटेल यांची मते वाढण्यास सुरुवात झाली, तर ११ व्या फेरीपासून त्यांनी खोडके यांच्यावर लीड घेतले ते २२ व्या फेरीपर्यंत कायम राखले. त्यानंतर मात्र उर्वरित तीन फेऱ्यांमध्ये खोडके यांनी ५४१३ मतांनी निर्विवाद बाजी मारली. यामध्ये काँग्रेसचे सुनील देशमुख यांना ५४६७४ व अलीम पटेल यांना ५४५९१ मते मिळाली आहे.


बडनेरा मतदारसंघात रवी राणा हे अपक्ष उमेदवार प्रीती बंड यांच्यावर पहिल्या फेरीपासून आघाडी घेऊन होते. राणा यांना १,२७,८०० तर बंड यांना ६०,८२६ व महाआघाडीमध्ये उद्ध‌वसेनेचे उमेदवार सुनील खराटे यांना ७१२१ मते मिळाली. यामध्ये राणा यांचा ६६,९७४ मतांनी विजय झाला. तिवस्यात भाजपचे राजेश वानखडे व काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांच्यात काट्याची लढत झाली. मात्र, वानखडे यांनी पहिल्या फेरीपासून आघाडी कायम ठेवली. राजेश वानखडे यांना ९९६६४ मते मिळाली. त्यांचा ७६१७ मतांनी विजय झाला, तर ठाकूर यांना ९२०४७ मते मिळाली. मेळघाट मतदारसंघात यावेळी मात्र इतिहास घडला. भाजपचे उमेदवार व माजी आमदार केवलराम काळे यांनी उच्चांकी १,४५,९७८ मते घेत काँग्रेसचे उमेदवार डॉ. हेमंत चिमोटे यांचा पराभव केला. चिमोटे यांना ३९११९ मते मिळाली, तर प्रहारचे आमदार राजकमार पटेल यांना २५२८१ मते मिळाली. 


अचलपूर मतदारसंघात चार वेळा विजयी बच्चू कडू यांना यावेळी पराभवाचा सामना करावा लागला. भाजपचे प्रवीण तायडे यांनी ७८२०१ मते मिळवीत कडू यांचा १२१३१ मतांनी पराभव केला. कडू यांना ६२७९१, तर काँग्रेसचे बबलू देशमुख यांना ६६०७० मते मिळाली. 


धामणगाव मतदारसंघात भाजपचे प्रताप अडसड यांनी गड राखला. थेट लढतीत त्यांनी काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांचा १६२२८ मतांनी पराभव केला. अडसड यांना ११०६४९, तर जगताप यांना ९४४१३ मते मिळाली आहेत. दर्यापूर मतदारसंघात महाविकास आघाडीमध्ये उद्धवसेनेचे गजानन लवटे १९७०९ मतांनी विजयी झाले. त्यांना ८७७४९ मते मिळाली, तर युवा स्वाभिमानची कास धरलेले भाजपचे माजी आमदार रमेश बुंदेले यांना ६८०४० व महायतीमध्ये शिंदेसेनेचे अभिजित अडसळ यांना २३६३२ मते मिळाली.


मोर्शी मतदारसंघात मैत्रीपूर्ण लढतीत भाजपचे उमेश यावलकर ६४९८८ मतांनी विजयी झाले. त्यांना ९९६८३ मते मिळाली. त्यांनी अजित पवार गटाचे आमदार देवेंद्र भुयार यांचा पराभव केला, भुयार यांना ३४६९५, शरद पवार गटाचे गिरीश कराळे ३१८८३, तर अपक्ष विक्रम ठाकरे यांना २६६२९ मते मिळाली आहेत.

Web Title: In seven out of eight constituencies in the district, Mahayuti won ground... Only one seat for Mahavikas Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.