शिक्षक बँकेत सत्ताधाऱ्यांचा विरोधकावरील अविश्वास प्रस्ताव फेटाळला
By जितेंद्र दखने | Published: April 3, 2023 06:59 PM2023-04-03T18:59:59+5:302023-04-03T19:00:14+5:30
शिक्षकांच्या जिव्हाळ्याची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षण सहकारी बँकेत सत्ताधारी विरोधी पक्षांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे.
अमरावती : शिक्षकांच्या जिव्हाळ्याची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद शिक्षण सहकारी बँकेत सत्ताधारी विरोधी पक्षांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला आहे. सत्ताधाऱ्यांकडून विरोधी पाच संचालकांवर विश्वास ठरावाचा प्रस्ताव उपनिबंधकांकडे सादर करण्यात आला होता. मात्र हा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे आता सत्ताधारी आणि विरोधी संचालकांमध्ये चांगलीच घुसखुश वाढवण्याची शक्यता आहे.
शिक्षक बँकेत शिक्षक समितीने एक हातीसत्ता स्थापन केली असून या पॅनलचे १६ संचालक निवडून आले आहेत. तर विरोधात पाच संचालक निवडून आले आहेत. अध्यक्षपदी गोकुळदास राऊत यांची वर्णी लागल्यानंतर सत्ताधारी व विरोधी संचालकांमध्ये संघर्ष सुरू झाला आहे. अनेक मुद्द्यावरून विरोधी संचालकांकडून सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यात येत आहे. मात्र बँकेच्या कामकाजात विनाकारण विरोधी संचालक आडकाटी आणत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला असून विरोधी गटातील संचालक प्रकाश झोड, संजय नागे, मंगेश खेरडे, मनोज चोरपगार आणि गौरव काळे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी विशेष सभेची परवानगी देण्याबाबतची मागणी विभागीय सहनिबंधक यांच्याकडे शिक्षक बॅकेतील सत्ताधारी संचालकांनी केली होती. मात्र हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. त्यामुळे तूर्तास विरोधकांवरील अविश्वासाचे सावट निवळले असले तरी येत्या काळात पुन्हा हा संघर्ष पेटण्याची दाट शक्यता आहे.
विरोधी संचालक काही कारण नसताना गत सहा महिन्यापासून तक्रारी करून बँकेच्या कामकाजाचा अडचणी निर्माण करीत आहे. सभासदांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले जात असताना विनाकारणच काही मंडळी सहकार विभागाकडे तक्रार करीत आहेत. दैनंदिन कामकाज सोडून बँकेला त्यांच्या विनाकारणच्या तक्रारी निस्तराव्या लागत आहेत. त्यामुळे बँकेचे नुकसान होत आहे. घटनेतील तरतुदी प्रमाणे आम्ही अविश्वासाची नोटीस दिली होती. - गोकुळदास राऊत, अध्यक्ष जि प शिक्षक बँक
विरोधी संचालक सत्ताधारी गटाच्या चुकीच्या निर्णय विरोधात ठामपणे उभे राहिले आहेत. विविध नीती वापरून विरोधी संचालकांचे तोंड बंद करण्याचा हा प्रयत्न आहे. विरोधी संचालकावर मानसिक दबाव या माध्यमातून निर्माण केला जात आहे. मात्र कुणाचाही दबाव न जुमानता सभासदांच्या हितासाठी लढत राहू. - प्रभाकर झोड संचालक विरोधी गट