बहिरम यात्रेत मातीच्या चुली उभारण्याचीही लगबग; पर्यावरणपुरक भांड्यांना पसंती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 04:58 PM2022-12-24T16:58:20+5:302022-12-24T16:59:26+5:30
मध्य प्रदेशातील 'हंडी' ट्रकने दाखल
परतवाडा (चंद्रपूर) : सर्वदूर चर्चेतील बहिरम यात्रेत मध्य प्रदेशातील मातीची हंडी व भांडी ट्रकने दाखल झाली आहेत. यात्रेदरम्यान मिळणारी ही पर्यावरणपूरक हंडी आणि भांडी यात्रेची ओळख असून, यात्रेकरूंसह पर्यटकांच्या पसंतीस उतरली आहेत.
मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील भैसदही तालुक्यातील झल्लार येथून ही हंडी व मातीची भांडी यात्रेत पोहोचली आहे. लहान-मोठ्या आकारात ती आहे. झल्लार येथील मंडळी पूर्वापार वंशपरंपरागत बहिरम यात्रेत दरवर्षी ती विकायला आणतात. यात्रेदरम्यान रस्त्याच्या कडेला विक्रीकरिता ठेवल्या गेलेली ही मातीची हंडी व भांडी लक्षवेधक ठरली आहेत.
पैशाची हंडी रुपयांत
बहिरम यात्रेत मिळणारी ही मातीची हंडी साठ वर्षांपूर्वी केवळ दहा पैशाला मिळायची. ती आज ५० ते ६० रुपयांनी मिळत आहे. एक पावापासून तर पंधरा किलोंपर्यंतची हंडी यात्रेत विकली जात आहे. आकार आणि क्षमतेनुसार या हंडीच्या भावात चढ-उतार बघायला मिळतो.
भाजीची चवच न्यारी
मातीच्या हंडीतील भाजीची चवच न्यारी असून, हंडीतील भाजीचे शौकीन यात्रेतच हंडी विकत घेतात. त्यात हळद, तेल, मीठ, पाणी टाकून उकळतात. नंतर हे पाणी फेकून त्यात भाजी शिजवतात. या भाजीसोबत जेवायला यात्रेतूनच भाकरी आणि पोळी विकत घेतात. हंडीतील भाजीचा आस्वाद घेतल्यानंतर त्याच ठिकाणी ती फोडून टाकतात. यात त्यांच्या वाट्याला सर्वोच्च आनंद येतो. यात्रेत सर्वोच्च आनंद देणारी ही हंडी आता घराघरांत पोचली आहे.
आकर्षक भांडी
हंडीसोबतच यात्रेत मातीच्या फ्लॉवर पॉटसह वेगवेगळ्या आकारांतील आकर्षक भांडी विक्रीला आहेत. या आकर्षक भांड्यांनी संक्रांतीच्या वाणातही जागा मिळविली आहे.
मातीच्या चुलीवर अखेरचा हात
बहिरम यात्रेत यात्रेकरूंना चुलीवरचे खास जेवण आणि हंडीतली भाजी उपलब्ध करून देणारे अनेक हॉटेल्स, खानावळी दरवर्षी असतात. यंदा यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. याकरिता सरळ रेषेत मातीच्या एकापेक्षा अधिक चुली उभारण्याची, बनविण्याची लगबग सुरू आहे. काहींनी त्या उभारल्या असून काही त्यावर अखेरचा हात फिरवीत आहेत.