लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत नऊ सचिवांना सक्तीचे प्रशिक्षण, कार्यमुक्त होण्याचे आदेश
By गणेश वासनिक | Published: April 3, 2024 06:20 PM2024-04-03T18:20:13+5:302024-04-03T18:20:31+5:30
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा ज्वर चढलेला असून राज्यात ५ टप्प्यात मतदान प्रक्रिया चालणार आहे.
अमरावती: लोकसभा निवडणुकीत आयएआयएस अधिकारी फुल्ली बिझी राहत असताना महाराष्ट्रातील प्रधान सचिव दर्जाच्या तब्बल नऊ अधिकाऱ्यांना उत्तराखंडमधील सक्तीच्या प्रशिक्षणासाठी तडकाफडकी निर्णय झाल्याने प्रशासनात खळबळ माजली आहेत, या सर्व सचिवांना गुरुवार ४ एप्रिलपासून कार्यमुक्त होण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाने निर्गमित केले आहेत. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचा ज्वर चढलेला असून राज्यात ५ टप्प्यात मतदान प्रक्रिया चालणार आहे. पहिला आणि दुसरा टप्पा विदर्भात पार पडणार असून याकरिता महसूल विभाग रात्र दिवस एक करीत निवडणुकीच्या प्रक्रियेत सहभागी झालेले आहे.
निवडणुकीवर लक्ष ठेवण्याकरिता इतर राज्यातील आयएएस अधिकारी निरीक्षक म्हणून दाखल झालेले असताना आणि निवडणुकीची सर्व सूत्र आयएएस अधिकारी यांचे हातात ठेवले जाते. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची वानवा निवडणूक आयोगाला नेहमीचं राहते. मात्र, महाराष्ट्रात निवडणुकीचा बिगुल वाजलेला असताना मंत्रालयातील तब्बल ९ सचिवांना सक्तीच्या प्रशिक्षणाला याच काळात का? पाठविण्यात आले, याबाबत आश्चर्य व्यक्त करण्यासारखे आहेत. सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सु.मो. महाडिक यांनी २६ मार्च २०२४ रोजी आदेश काढलेला असून भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांनी ४ एप्रिल २०२४ पासून प्रशिक्षण सक्तीचे केले आहे.
सक्तीचे प्रशिक्षण कुणाला
उत्तरखंड मसुरी येथे आयएएस अकादमीत महाराष्ट्रातील एकूण ९ प्रधान सचिव दर्जाचे अधिकारी सक्तीच्या प्रशिक्षणाकरिता पाठविले जात आहे. १९ दिवसाच्या प्रशिक्षणाकरिता मंत्रालयातील वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, विकाअ (अपील्स) चे प्रधान सचिव संतोष कुमार, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव ए.एस.के. गुप्ता, मदत व पुर्नवसन मंत्रालयातील प्रधान सचिव डॉ. सोनीया सेठी, गृहविभागातील प्रधान सचिव राधिका रस्तोगी, नगर विकास विभाग-२ चे प्रधान सचिव डॉ.के.एच. गोविंदराज, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, माहिती व तंत्रज्ञान विभागाचे पराग जैन-नैनुरिया, कामगार विभागाच्या विनीता वैद्य-सिंगल अशा एकूण ९ प्रधान सचिवांना सक्तीच्या प्रशिक्षण कार्यक्रमास हजर राहण्याचे निर्देश दिलेले आहेत.
त्वरित कार्यमुक्त होण्याचे आदेश
मसुरी उत्तराखंड येथे ८ एप्रिलपासून ‘मीड करिअर ट्रेनिंग’ करिता राज्यातील प्रधान सचिवांना सक्तीच्या प्रशिक्षणाकरिता गुरुवार ४ एप्रिलपासून कार्यमुक्त होऊन त्यांच्याकडे असलेला कार्यभार प्रमाणपत्र (सीटीसी) सह सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, वनविभागाचे प्रधान सचिव म्हणून विकास खारगे राहतील. विकाअ (अपील्सचे) डॉ. रामास्वामी, नगर विकास विभाग १ चे डॉ. इकबालसिंह चहल, मदत व पुर्नवसनचे राजेश कुमार, गृहविभाग आणि सुरक्षा विभागाच्या सुजाता सैनिक, नगरविकास विभाग २ च्या मनीषा म्हैसकर, उच्च व तंत्र शिक्षणाच्या रणजितसिंह देओल, माहिती तंत्रज्ञान विभागाचे विरेंद्र सिंह तर कामगार विभागाचा पदभार डॉ. हर्षदीप कांबळे हे सांभाळतील.