जिजाऊ बँकेच्या आमसभेत सभासदांचा प्रचंड गदारोळ, कारभारावर आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2023 12:55 PM2023-09-25T12:55:57+5:302023-09-25T12:56:59+5:30

वैष्णवी भार्गव या तरुणीने वडिलांच्या कर्ज प्रकरणाचा विचारला जाब

In the general meeting of Jijau Bank, there was a lot of commotion by the members, objections to the affairs | जिजाऊ बँकेच्या आमसभेत सभासदांचा प्रचंड गदारोळ, कारभारावर आक्षेप

जिजाऊ बँकेच्या आमसभेत सभासदांचा प्रचंड गदारोळ, कारभारावर आक्षेप

googlenewsNext

अमरावती : येथील जिजाऊ कमर्शियल को-ऑप. बँकेच्या रविवारी आयोजित वार्षिक सभेत ठेवीदारांच्या ठेवी आणि संचालकांच्या एककल्ली कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून सभासदांनी प्रचंड गदारोळ घातला. आश्विन चौधरी यांचे सभासद रद्द प्रकरण गाजले, तर वैष्णवी भार्गव या तरुणीने वडिलांच्या कर्ज प्रकरणाचा जाब विचारून सत्ताधारी संचालकांची भंबेरी उडविली. अहवाल पुस्तिका, अध्यक्षांचे लांबलेले प्रास्ताविक व इतर मुद्द्यांवर चांगलीच खडाजंगी झाली. प्रसंगी पोलिसांना सुद्धा पाचारण करावे लागले.

जिजाऊ बँकेची वार्षिक आमसभा वादळी होणार याची चुणूक संचालकांना मिळाल्याने आधीच संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. अध्यक्ष अविनाश कोठाळे यांच्या अध्यक्षतेत सभेला सुरुवात होताच सुरुवातीला इतिवृत्तांत घेण्यात आले. त्यानंतर अध्यक्षांनी प्रास्ताविकाला सुरूवात केली. बँकेची कार्यपद्धती, सभासदांमध्ये बँकेविषयी होत असलेला अपप्रचार, ठेवी या सर्व मुद्द्यांवर त्यांनी प्रकाश टाकला. मात्र, त्यांच्या प्रास्ताविकावर सभासदांनी आक्षेप घेतला. अध्यक्षांच्या भाषणात अनावश्यक बाबी असल्याचा आरोप सभासदांनी केला. त्यावेळी चांगलाच गदारोळ झाला. प्रास्ताविकात अध्यक्षांनी मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या एका प्रकरणाचा हवाला दिल्यानंतर सभासद चांगलेच आक्रमक झाले.

अध्यक्षांनी पुरूषोत्तम खेडेकर यांची माफी मागावी, यासाठी काही सभासदांनी भवनात खुल्या जागेवर जाऊन आरडा ओरड सुरू केली. तर काहींनी थेट व्यासपीठाकडे धाव घेतली. सीईओचे प्रशासनावर नियंत्रण नसल्याचा आरोप सभासदांनी केला. त्यावेळी सभासदांकडील माइक बंद करण्याचे आदेश अध्यक्षांनी दिले आणि गोंधळात आणखी भर पडली. काही सभासदांनी इतिवृत्तांत घरपोच न मिळाल्याने नाराजी व्यक्त केली. तर बँकेच्या आर्थिक अहवाल पुस्तिकेत अनेक चुका आढळून आल्याने सभासदांनी सत्ताधाऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले. आमसभेच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तगडा पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.

 वडिलांच्या खात्यातून २५ लाख गेले कुठे?

मोर्शी येथील वैष्णवी संजय भार्गव या युवतीने जिजाऊ बँकेने ७२ लाखांचे कर्ज मंजूर केले, पण २५ लाखांची रक्कम कुणाच्या खात्यात गेली? असा सवाल उपस्थित करून अध्यक्षांसह इतर संचालकांची बोलती बंद केली. ट्रान्सफर झाले कसे? अशी विचारणा ती करत असताना माईक बंद करण्याचे फर्मान झाले.

‘लोकमत’ गाजला, पहिल्यांदाच तू-तू, मै-मै

तपासणी अहवालाच्या आधारेच बँकेच्या अनियमित कारभाराबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून ते लोकदरबारात मांडले. मात्र, रविवारी आमसभेत ‘लोकमत’च्या वृत्तावर अध्यक्ष अविनाश कोठाळे यांनी आक्षेप घेतला. कोठाळे यांना रिझर्व्ह बँक, न्याय व्यवस्था, प्रशासकीय अधिकाऱ्यांचा कारभार मान्य नाही. ‘मी’ म्हणजेच ‘सबकुछ’ अशा अविर्भावात त्यांनी प्रास्ताविक केले. खरे तर ‘लोकमत’कडे पुरावे आहेत, अहवाल खोटा असेल तर वरिष्ठ पातळीवर दाद मागावी, असे अपेक्षित आहे. सभासदांनी ठेवी सुरक्षित असावी आणि बँकेच्या ढासळलेल्या कारभारावर बोट ठेवले असून, तो त्यांचा अधिकार असल्याची भावना अनेक सभासदांची असल्याचे दिसून आले. बँकेच्या इतिहासात आमसभेत पहिल्यांदाच तू-तू, मै-मै झाली.

जिजाऊ बँक आणि ठेवीदारांच्या ठेवी सुरक्षित असाव्यात. निवडणुकीच्या अनुषंगाने पद, खुर्चीसाठी भांडण किंवा बँकेला कोणीही बदनाम करू नये. ही बँक सामान्यांची आहे. कुणाची खासगी मालमत्ता नाही, याचादेखील विचार व्हावा.

- ॲड. श्रीकांत खोरगडे, सभासद, जिजाऊ बँक

मराठा सेवा संघाच्या संकल्पनेतूनच जिजाऊ बँकेची स्थापना झाली, परंतु विद्यमान अध्यक्ष व संचालक मंडळ हे अस्तित्व नाकारत असेल तर बोलावेच लागेल. आमसभेत सभासदांसोबत संवाद व्हावा. त्यांचे म्हणणे ऐकून् घ्यावे, असे अपेक्षित आहे. बंक जनतेची आहे. मात्र, पोलिस बोलावणे, सभासदांना अटकेची धमकी देणे हे सयुक्तिक नाही.

- मैथली पाटील, सभासद तथा माजी जिल्हा अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड

Web Title: In the general meeting of Jijau Bank, there was a lot of commotion by the members, objections to the affairs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.