एकनाथ शिंदेंचा भाजपकडून गेमच झाला; बच्चू कडू यांचा घरचा अहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 07:33 AM2024-06-22T07:33:00+5:302024-06-22T07:33:32+5:30
पुढच्या टप्प्यात भाजप एकनाथ शिंदेंनाही त्यांचा मतदारसंघ बदलायला लावू शकतं; बच्चू कडूंचा हल्लाबोल.
लोकमत न्यूज नेटवर्क, अमरावती : भाजपनेच एकनाथ शिंदे यांचा गेम केला. शिवसेनेच्या सोबत राहून भाजपने असे करणे योग्य नाही, असे म्हणत प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी महायुतीतील दादा पक्ष भाजपला घरचा आहेर दिला. विरोध असेल तेथे उमेदवार बदलला नाही, त्याच वेळी सहकारी पक्षांवर मात्र उमेदवार बदलण्यासाठी दबाव टाकला होता, असा आरोप करीत त्यांनी भाजपच्या दादागिरीला आव्हान दिले आहे.
अमरावतीत भाजप पक्षातील नेत्यांसह महायुतीतील घटकांचा नवनीत राणा यांच्या नावाला विरोध होता. तरीदेखील भाजपने त्यांना उमेदवारी दिली. हिंगोली येथे हेमंत पाटील यांना जाहीर झालेली उमेदवारी भाजपने नाकारली. उमेदवार शिवसेनेचा आणि उमेदवारी नाकारण्याचा अधिकार भाजप बाळगून होता. शिंदेसेनेचे चार उमेदवार बदलण्यास भाजपने भाग पाडले.
पुढच्या टप्प्यात एखादेवेळी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील या मतदारसंघात उभे राहू नका, त्या मतदारसंघातून उमेदवारी दाखल करा, असे सांगतील, असे ते म्हणाले.