गाडगे बाबांचे नाव असलेल्या विद्यापीठातच अस्वच्छतेचे साम्राज्य, एनएसयूआयचे आंदोलन
By उज्वल भालेकर | Published: December 20, 2023 06:29 PM2023-12-20T18:29:49+5:302023-12-20T18:30:45+5:30
कुलगुरुंना निवेदन देऊन तातडीने विद्यापीठ परिसराची स्वच्छता करण्याची मागणीही केली.
अमरावती: वैराग्यमूर्ती संत गाडगे बाबा यांनी आयुष्यभर स्वच्छतेचा संदेश दिला. परंतु त्याच संत गाडगे बाबांचे नाव असलेल्या विद्यापीठात मात्र अस्वच्छतेचे साम्राज्य पहायला मिळत आहे. याला जबाबदार विद्यापीठ प्रशासन आहे. त्यामुळे गाडगे बाबा यांच्या पुण्यतिथी दिनाचे औचित्य साधून बुधवारी नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाने (एनएसयूआय) विद्यापीठात स्वच्छता मोहीम राबवत आंदोलन केले. तसेच कुलगुरुंना निवेदन देऊन तातडीने विद्यापीठ परिसराची स्वच्छता करण्याची मागणीही केली.
संत गाडगे बाबा यांनी समाजामध्ये स्वच्छतेचे महत्व पटवून देत आपल्या किर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातील अंधश्रद्धेची घाण देखील साफ करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या याच कार्यामुळे अमरावती विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आले. परंतु त्याच विद्यापीठ प्रशासनाला गाडगे बाबांच्या विचारांचा विसर पडल्याचा आरोप एनएसयूआयने केला आहे. प्रशासन आणि स्वच्छता ठेकेदाराच्या उदासीनतेमुळे संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने याची दखल घेत विद्यापीठ परिसराची स्वच्छता करण्याची मागणी केली आहे.
स्वच्छता न झाल्यास कुलगुरुंच्या दालनामध्ये कचरा टाकण्याचा इशाराही निवेदनातून दिला आहे. यावेळी एनएसयूआयच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठात स्वच्छता मोहीम राबवून विद्यापीठ प्रशासनाचा निषेधही नोंदविला. यावेळी संकेत साहू, समीर जवंजाळ, योगेश बुदीले, राहूल रायबोले, वैभव देशमुख, अनिकेत ढेंगळे, अक्षय साबळे, आकाश गेडाम, वेदांत केणे, अमित महात्मे, आकाश घुराटकर, धीरज बोबडे आदी उपस्थित होते.