अतिक्रमणमुक्त अमरावतीला छेद

By admin | Published: November 9, 2016 12:17 AM2016-11-09T00:17:09+5:302016-11-09T00:17:09+5:30

महापालिका आयुक्तांच्या ‘अतिक्रमणमुक्त अमरावती’ या संकल्पनेला अतिक्रमणधारकांनी छेद दिला आहे.

Inaccessible Holes in Amravati | अतिक्रमणमुक्त अमरावतीला छेद

अतिक्रमणमुक्त अमरावतीला छेद

Next

बेशिस्त वाहतुकीची कोंडी : अतिक्रमणधारकांची मुजोरी, कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज
अमरावती : महापालिका आयुक्तांच्या ‘अतिक्रमणमुक्त अमरावती’ या संकल्पनेला अतिक्रमणधारकांनी छेद दिला आहे. रस्त्यावरील बेशिस्त वाहतूक रस्ता व्यापलेले फेरीवाले व त्यापुढे दुचाकी वाहनांचे पार्किंग, अशा विचित्र कोंडीत अमरावतीकर नागरिक अडकले आहेत. अतिक्रमण निर्मूलन पथकाची पाठ फिरताच अतिक्रमण ‘जैसे थे’ होत असल्याने त्यांच्या मुजोरीला आळा घालण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळल्यानंतर हेमंत पवार यांनी लगोलग अतिक्रमणाचा मुद्दा हाती घेतला. त्यासाठी मागील पाच महिन्यांपासून कारवाई सुरू आहे. मात्र, मुजोर अतिक्रमणधारक महापालिका किंवा अतिक्रमण निर्मूलन पथकाला ‘भाव’ देत नसल्याने अतिक्रमणाची समस्या अधिक बिकट झाली आहे. अनधिकृत पार्किंग आणि वाढते अतिक्रमण अशा दोन्ही समस्या सोडविण्याचे आव्हान आयुक्तांना पेलायचे आहे. ज्याठिकाणचे अतिक्रमण काढले तेथे पुन्हा तशीच स्थिती निर्माण होऊ नये, यासाठी स्वतंत्र पथके निर्माण करण्याची सल्लावजा सूचना पोलिसांनी दिली होती. मात्र, अतिक्रमण निर्मूलन विभागाने हेतुपुस्सर दुर्लक्ष चालविले आहे. परिणामी अतिक्रमणधारकांचे फावले असून पथक फिरताच पुन्हा ‘जैसे थे’ होणारे अतिक्रमण महापालिकेच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. (प्रतिनिधी)

येथे थाटले जाते अतिक्रमण
शहरात चित्रा चौक, अंबादेवी रोड, चुनाभट्टी, इतवारा बाजार, जि.प.विश्रामगृह, टांगापाडाव, सरोज, शाम, राजकमल, चौधरी चौक, मालवीय चौक, जवाहर गेट, उड्डाणपुलाशेजारचा भाग, वलगाव रोड, चांदनी चौक, बसस्थानक मार्ग यांसह शहरातील विविध भागात अतिक्रमणाची समस्या कायम आहे. येथून अनेकदा अतिक्रमण हुसकावून लावले. मात्र, पथकाची पाठ फिरताच पुन्हा ते ‘जैसे थे’ होत असल्याचे चित्र आहे.

वाहतूक पोलिसांचे मौन
शहरातील वाहतूक शाखेने अतिक्रमण निर्मुलनाबाबत मौन धारण केले आहे. पार्किंग असो की अतिक्रमण अशा समस्यांची जबाबदारी महापालिकेवर लोटून वाहतूक विभागाने अलिप्त आणि अर्थपूर्ण भूमिका घेतली आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेचा पार बोजवारा उडाला असताना वाहतूक विभागाची बोटचेपी भूमिका अतिक्रमण आणि अनधिकृत पार्किंगला बळ देणारी ठरली आहे. शहर अतिक्रमणमुक्त करण्याची जबाबदारी संयुक्तपणे पोलीस आणि महापालिका यंत्रणेची आहे.

तातडीने व्हावी कारवाई
शहरातील अतिक्रमणाची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे रस्ते अरुंद होत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यांवर बाजार भरत आहे. त्यामुळे पार्किंगला अडथळा होतो. हे अतिक्रमण हटविण्याची कारवाई तातडीने व्हावी, अशी मागणी होत आहे.
अतिक्रमणयुक्त ठिकाणे निश्चित करण्यात यावी, पुन्हा पुन्हा होणाऱ्या अतिक्रमणास आळा घातल्यास ही समस्या कमी होईल. मनपाच्या हॉकर्स झोनमध्ये हॉकर्सने जावे. अतिक्रमण हटविल्यानंतर पुन्हा ते होऊ नये, यासाठी उपाययोजनांची गरज प्रतिपादित करण्यात आली आहे. स्थायी दुकानदारांचे अतिक्रमणही डोकेदुखी ठरले आहे.

Web Title: Inaccessible Holes in Amravati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.