नववर्षात खगोलीय घटनांचे विलोभनीय क्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 10:42 PM2019-01-13T22:42:34+5:302019-01-13T22:43:02+5:30
अंतराळातील घडामोडीतून निर्माण होणाऱ्या खगोलीय घटनांची नववर्षात रेलचेल राहणार आहे. आगामी वर्षात तीन सुपरमुन, युरेनस, नेपच्युन, गुरु व शनि पृथ्वीजवळ येणार आहे. चंद्रग्रहण व कंकणाकृती सुर्यग्रहणांचेही विलोभनीय क्षण यंदा अवलोकता येईल.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : अंतराळातील घडामोडीतून निर्माण होणाऱ्या खगोलीय घटनांची नववर्षात रेलचेल राहणार आहे. आगामी वर्षात तीन सुपरमुन, युरेनस, नेपच्युन, गुरु व शनि पृथ्वीजवळ येणार आहे. चंद्रग्रहण व कंकणाकृती सुर्यग्रहणांचेही विलोभनीय क्षण यंदा अवलोकता येईल.
यंदा खगोलीय घटनांमध्ये २१ जानेवारीला ‘सुपरमुन’ पाहता येईल. यंदा असे तीन सुपरमुन दिसणार आहेत. याच दिवशी चंद्र हा पृथ्वीपासून सर्वात कमी अंतरावर राहणार आहे. चंद्र मोठा व प्रकाशमान राहणार आहे. फ्रेबुवारी महिन्याच्या १९ तारखेला दुसरा सुपम मुन दिसणार आहे. २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सूर्य मावळल्यानंतर पश्चिम भागातील आकाशात बुध ग्रह दिसेल. २० मार्च रोजी जगभरात दिवस व रात्र एकसमान राहील. या दिवसाला वसंत संपाद दिन, असेही म्हटल्या जाते. ६ व ७ मे रोजी उल्का वर्षाव, १० जून रोजी गुरु ग्रह पृथ्वीपासून कमी अंतरावर राहणार आहे.
२१ जून रोजी सर्वात मोठा दिवस राहणार असून, तो दिवस १३ तास १३ मिनीटांचा राहिल. २ जुलै रोजी खग्रास सूर्यग्रहण, ९ जुलै रोजी शनि पृथ्वीजवळ, १६ जुलै रोजी खंडग्रास चंद्रग्रहण, १९ सप्टेंबर रोजी नेपच्यून व २७ आॅक्टोंबर रोजी युरेनस पृथ्वीजवळ राहणार असून, २३ सप्टेंबर रोजी दिवस व रात्र एकसमान राहणार आहे.
१७ व १८ नोव्हेंबर रोजी सिंह तारकासमुहातून उल्कावर्षाव, त्यानंतर २२ डिसेंबर रोजी सर्वात लहान दिवस राहील, त्यानंतर २६ डिसेंबर रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण दक्षिण भारतातून दिसणार आहे.
यंदा विविध खगोलीय घटनांचे अवलोकन करता येणार आहे. यामध्ये खगोल शास्त्राची माहिती जाणून घ्यायची संधी उपलब्ध झाली असल्याची माहिती हौशी खगोलीय अभ्यासक विजय गिरुळकर यांनी दिली.
टेलिस्कोपने पाहता येणार
१० जून रोजी गुरु-पृथ्वीजवळ असल्याचे क्षण टेलिस्कोपद्वारे पाहणे शक्य राहणार आहे. याशिवाय २७ आॅक्टोंबर रोजी युरेनस ग्रहाला हायरेंज टेलिस्कोपद्वारे बघता येईल. या नैसर्गिक घटनांचा मानवी जीवनावर कोणतेही वाईट परिणाम होणार नसून या विलोभनिय घटनांचे निरीक्षण करून आनंद घेण्याचे आवाहन मराठी विज्ञान परिषदेचे विजय गिरुळकर व प्रवीण गुल्हाने यांनी केले आहे.