सहा लाख शेतक-यांना मिळावी विम्याची भरपाई, मूग, उडीद, सोयाबीन बाधित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2017 05:29 PM2017-11-09T17:29:43+5:302017-11-09T17:29:58+5:30

अमरावती : यंदाच्या खरीप हंगामात विभागात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा २४ टक्के पाऊस कमी झाला.

Inadequate compensation for six lakh farmers, mung, urid, soyabean inhibited | सहा लाख शेतक-यांना मिळावी विम्याची भरपाई, मूग, उडीद, सोयाबीन बाधित

सहा लाख शेतक-यांना मिळावी विम्याची भरपाई, मूग, उडीद, सोयाबीन बाधित

Next

गजानन मोहोड
अमरावती : यंदाच्या खरीप हंगामात विभागात जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा २४ टक्के पाऊस कमी झाला. पावसाच्या प्रदीर्घ तुटीमुळे खरिपाची मूग, उडीद व सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाले. कपाशीवर मोठ्या प्रमाणात बोंडअळीचा हल्ला झालाय. परिणामी पिकांच्या उत्पादनात ५० ते ६० टक्क्यांची घट होणार आहे. त्यामुळे खरीप पीकविमा काढलेल्या सहा लाख शेतक-यांना विम्याचा लाभ मिळावा, अशी शेतक-यांची मागणी आहे.

नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांपासून पिकांचे नुकसान झाल्यास शेतक-यांना मदत मिळावी, यासाठी यंदाच्या खरीप हंगामातील नऊ पिकांना विम्याचे कवच देण्यात आले. जिल्ह्यात अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ही योजना राबविण्यात आली. ही योजना कर्जदार शेतक-यांसाठी सक्तीची, तर गैरकर्जदार शेतक-यांसाठी ऐच्छिक होती. विभागातील ६ लाख ३ हजार ६५७ शेतक-यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आहे.

यंदाच्या खरीप हंगामात अमरावती विभागात ३१ लाख ६२ हजार ५ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. पावसात खंड असल्यामुळे शेतक-यांवर दुबार, तिबार पेरणीची वेळ आली. त्यानंतरही पावसात खंड असल्यामुळे ६० दिवसांचे मूग व उडिदाचे पीक हातचे गेले. पावसाच्या सततच्या खंडामुळे सोयाबीन बाधित झाले, तर काढणीच्या काळात अवकाळी पावसामुळे प्रतवारी खराब झाली. एफएक्यू ग्रेड असल्यामुळे शासकीय खरेदी केंद्रांवरदेखील शेतक-यांना माघारी पाठविले जाते. कपाशीची तीच गत आहे. बीटीचे बोंड गुलाबी अळीने पोखरल्यामुळे कापसाचे सरासरी उत्पादन ५६ टक्क्यांनी घटले व दर्जाही निकृष्ट झाला. यंदाच्या हंगामात शेतकरी अडचणीत आला असल्याने त्याला विम्याची भरपाई मिळणे गरजेचे आहे.

असा आहे जिल्हानिहाय सहभाग
पीकविमा योजनेत विभागात ६,०३,६५७ शेतकºयांनी सहभाग नोंदविला. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यात १,६६,०४५, अकोला १,०३,०५१, वाशिम ८३,०५६, अमरावती ९५,९८२, तर यवतमाळ जिल्ह्यात १,५५,५२३ शेतकºयांचा सहभाग आहे. यामध्ये २,००,८३३ शेतक-यांनी आॅनलाइन, ४३,३६३ शेतक-यांनी जनसुविधा केंद्रात, १,९४,४७५ शेतकरी कर्जदार असल्याने सक्तीने, तर १,६४,९८६ गैरकर्जदार शेतक-यांनी या विमा योजनेत सहभाग नोंदवला आहे. या सर्वांना लाभ मिळावा, अशी शेतक-यांची मागणी आहे.

पावसाळ्यात ३६ दिवसच पाऊस
यंदा विभागात सरासरी ७६ टक्के पाऊस पडल्याने २४ टक्के पावसाची तूट आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यांत केवळ ३६ दिवसच पाऊस पडला. यामध्ये जून महिन्यात ९ दिवस, जुलै १२, आॅगस्ट ९, सप्टेंबर ८, तर आॅक्टोबर महिन्यात फक्त ८ दिवसच पाऊस पडला असल्याचा कृषी विभागाचा अहवाल आहे. विभागातील पिकांचे सरासरी ४० ते ५० टक्के नुकसान झाल्याचे शासनाला पाठविलेल्या अहवालात नमूद आहे.

Web Title: Inadequate compensation for six lakh farmers, mung, urid, soyabean inhibited

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.