गाळेधारकांचे पालिकेसमोर बेमुदत उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2016 12:05 AM2016-08-14T00:05:40+5:302016-08-14T00:05:40+5:30
स्थानिक नगर परिषदेच्या गाळेधारकांनी होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारपासून नगर पालिकेसमोर बेमुदत उपोषणाला आंरभ केला आहे.
न.प.चा वाद चव्हाट्यावर : पालकमंत्र्यांना निवेदन
अंजनगाव सुर्जी : स्थानिक नगर परिषदेच्या गाळेधारकांनी होणाऱ्या अन्यायाविरुद्ध पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारपासून नगर पालिकेसमोर बेमुदत उपोषणाला आंरभ केला आहे. यासंदर्भात पालकमंत्री, खासदार, आमदारांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
२० वर्षांपासून पालिकेचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टिकोनातून त्याकाळात न.प.च्या काही अटींवर दुकानंदारांना गाळे वितरित करण्यात आले होते. नियमानुसार पालिकेने हर्रासामध्ये बोली बोलून गाळेधारकांकडून टॅक्स, डिपॉझिट भरून भाडेतत्त्वावर दुकाने दिली होती. सदर दुकानांची मुदत संपल्यानंतर करारनाम्यामध्ये नूतनीकरण करून पुन्हा योग्य ती वाढीव दर लावून दुकान गाळे नूतनीकरण करून द्यावे, या अटीनुसार गाळेधारकांनी पालिकेकडे रीतसर अर्ज करून नूतनीकरणासाठी अर्ज सादर केले. परंतु यामध्ये मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व संबंधित सत्ताधारी नगरसेवकांनी गाळेधारकांचे कोणतेही मत जाणून न घेता केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी ८७+३५ लोकांचा सामुदायिक नूतनीकरणासाठी अर्ज सादर असताना केवळ ज्या ३५ लोकांनी मागणीवरून पैशांची देवाण-घेवाण केली त्या लोकांचे नूतनीकरण करण्यासाठी ठराव घेऊन स्वत: मुख्याधिकारी, नगराध्यक्षांनी संगनमताने चुकीचा ठराव घेतला. यामधून ८७ लोकांना पूर्णपणे वगळण्यात आले. त्यामुळे उर्वरित गोळधारकांनी याबाबतची तक्रार नगरविकास राज्यमंत्री, पालकमंत्री, आमदार व संबंधित विभागाकडे केली. परंतु त्याचा कोणताही उपयोग झाला नाही. यामुळे वंचित गळेधारकांनी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला. व्यापारी संघटनेच्या आंदोलनामुळे हा वाद पुन्हा चव्हाट्यावर येणार काय, याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.(शहर प्रतिनिधी)
मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व त्यांच्या काही नगरसेविकांनी घेतलेल्या ठरावाला बगल देऊन ठरावात चुकीचा बदल करून केवळ ३५ लोकांचा ठराव मंजूर करण्यासाठी सभेसमोर ठेवण्यात आला. या ठरावाला विरोध केला आहे.
सुनिता मुरकुटे,नगरसेविका
सदरचा ३५ लोकांचा नूतनीकरणाचा ठराव घेतला आहे. परंतु आम्ही आता पूर्ण गाळेधारकांचा नूतनीकरणाचा ठराव घेणार असून उर्वरित गाळेधारकांचे नूतनीकरण करून देणार आहोत, असे लेखी पत्र उपोषनकर्त्यांना आम्ही दिले आहे.
संदीप बोरकर,मुख्याधिकारी