न्यायालयाच्या नवीन इमारतीचे आज उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 11:34 PM2018-03-09T23:34:39+5:302018-03-09T23:34:39+5:30
कोट्यवधी खर्चून बांधण्यात आलेल्या अमरावती जिल्हा न्यायालयाच्या शानदार इमारतीचे शनिवार, ९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे व मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी न्यायमूर्ती विजया ताहिलरमाणी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे.
आॅनलाईन लोकमत
अमरावती : कोट्यवधी खर्चून बांधण्यात आलेल्या अमरावती जिल्हा न्यायालयाच्या शानदार इमारतीचे शनिवार, ९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शरद बोबडे व मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी न्यायमूर्ती विजया ताहिलरमाणी यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे.
उद्घाटन सोहळ्याला विशेष पाहुणे म्हणून उच्च न्यायालयाचे न्या. भूषण गवई, न्या. प्रदीप देशमुख, न्या. सुनील शुक्रे, विजय आचलिया, पालकमंत्री प्रवीण पोटे, विधी व न्याय राज्यमंत्री रणजित उपस्थित राहणार आहेत. स्थानिक कॅम्प रोड स्थित न्यायालयाच्या शानदार बहुमजली इमारतीची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. रोषणाईमुळे न्यायालय परिसर झळाळून निघाला आहे. या कार्यक्रमात उपस्थित राहण्याचे आवाहन प्रमुख व जिल्हा सत्र न्यायाधीश अनिल पानसरे यांच्यासह अमरावती वकील संघाचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे यांनी केले आहे. अमरावकरांनादेखील न्यायालयाची देखणी वास्तू व सोहळ्याची उत्सुकता लागली आहे.
नितीन गभणे यांचाही सत्कार
जिल्हा न्यायालयाची नवीन इमारत इंदू कन्स्ट्रक्शनचे नितीन गभणे यांनी साकारली आहे. अत्यंत सुंदर, अशी ही इमारत अमरावतीची शान बनली आहे. शनिवारी या नवीन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात कंत्राटदार नितीन गभणे यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार केला जाणार आहे.