साहित्यरत्न सुदामदादा सावरकर साहित्य संमेलनाचे थाटात उद्घाटन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2019 06:18 PM2019-01-19T18:18:00+5:302019-01-19T18:19:51+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचे संकलन आणि संपादन करून ते संपूर्ण साहित्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य साहित्यरत्न सुदामदादा सावरकर यांनी केले.
तिवसा (अमरावती) : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या साहित्याचे संकलन आणि संपादन करून ते संपूर्ण साहित्य जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य साहित्यरत्न सुदामदादा सावरकर यांनी केले. राष्ट्रसंतांच्या जीवनावर जीवनपयोगी नावाचे ११ खंड लिहून राष्ट्रसंतांचे खरे चरित्र जगापर्यंत नेणारे सुदामदादा हे सर्वोत्तम साहित्यिक होते, असे प्रतिपादन साहित्यिक सतीश तराळ यांनी केले.
श्रीक्षेत्र वरखेड येथे आयोजित दोन दिवसीय साहित्यरत्न सुदामदादा सावरकर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानाहून सतीश तराळ यांनी मार्गदर्शन केले. शनिवारी सकाळी ८ वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाला सुरुवात झाली. ह.भ.प. लक्ष्मणदास काळे महाराज यांनी साहित्य संमेलनाचे उद्घाटन केले. याप्रसंगी विचारपीठावर अ.भा. श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सरचिटणीस जनार्दन बोथे, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव शेषराव खाडे, साहित्यिक सुभाष सावरकर, विघे गुरुजी, जि.प. सदस्य अभिजित बोके, रामचंद्र कांडलकर, प्रल्हाद पारिसे, सरपंच मालू बोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्घाटक ह.भ.प. लक्ष्मणदास काळे महाराज यांनी आपल्या रसाळ वाणीतून सुदामदादा आणि राष्ट्रसंतांच्या कार्याची महती विशद केली. याप्रसंगी जनार्दन बोथे, सुभाष सावरकर यांचीही भाषणे झाली. संचालन मंदा नांदूरकर व आभार प्रदर्शन रमेश बोके यांनी केले. कार्यक्रमाला श्रीगुरुदेवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.