‘शोध मराठी मनाचा’ संमेलनाचे उद्घाटन
By admin | Published: January 2, 2016 08:28 AM2016-01-02T08:28:59+5:302016-01-02T08:28:59+5:30
जागतिक मराठी अकादमीद्वारा ‘शोध मराठी मनाचा’ या दोन दिवसीय संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले.
जागतिक मराठी अकादमीचे आयोजन : देश-विदेशातील मराठी माणसांची मांदियाळी
अमरावती : जागतिक मराठी अकादमीद्वारा ‘शोध मराठी मनाचा’ या दोन दिवसीय संमेलनाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. यावेळी सनई चौघडा, तुतारीच्या निनादाने परिसरात चैतन्य आले. मंचावर देश, विदेशातील मराठी माणसांची मांदियाळी लक्षवेधक ठरली.
संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात आयोजित संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, विशेष अतिथी म्हणून माजी मुख्यमंत्री तथा देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते. मंचावर स्वागताध्यक्ष तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री रणजित पाटील, खा.आनंदराव अडसूळ, सुनील देशमुख, रवी राणा, यशोमती ठाकूर, अनिल बोंडे, रमेश बुंदेले, वीरेंद्र जगताप या आमदारद्वयांसह महापौर चरणजितकौर नंदा, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सतीश उईके, मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे, उपाध्यक्ष गिरीश गांधी, आस्ट्रेलिया येथील स्थापत्य अभियंता विजय जोशी, गायिका वैशाली माडे, केसरी पाटील, मंदार जोगळेकर, किशोर रांगणीकर, दीपक गेडा, सतीश राणे, मोहन गोरे, शशी भालकेर, शिशिलिया कार्वो आदी उपस्थित होते.
कार्यक्रमस्थळी माजी आमदार बी.टी देशमुख, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, काँग्रेसचे प्रदेश सचिव संजय खोडके, पक्षनेता बबलू शेखावत, स्थायी समिती सभापती विलास इंगोले, गटनेता अविनाश मार्डीकर, रामेश्वर अभ्यंकर, महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार, निवेदिता चौधरी, अनुराधा वऱ्हाडे आदी उपस्थित होते. संमेलनाचे उद्घाटन छत्रपतीे शिवाजी महाराजांचे मूर्तीपूजन व दीप प्रज्ज्वलनाने करण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, खा. आनंदराव अडसूळ, पालकमंत्री प्रवीण पोटे, आमदार सुनील देशमुख, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनीही मनोगत व्यक्त केले. संमेलनाच्या प्रारंभी अमरावतीची गौरवगाथा शिल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान गायिका वैशाली माडे यांचा सत्कार करण्यात आला. चित्रकार सी.आर शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना चित्रकृती दिली.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर व शेतकरी संघटनेचे शरद जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संचालन सोमेश्वर पुसदकर व आभार प्रदर्शन निशांत गांधी यांनी केले. उद्घाटन समारंभाचा समारोप वैशाली माडे यांच्या पसायदान गायनाने झाला. संमेलनात देश, विदेशात मराठी माणसांनी यशाच्या पताका रोवल्या त्यांच्या मुलाखती ‘सक्सेस स्टोरी’च्या रुपाने उलगडणार आहे. या संमेलनाचा समारोप शनिवारी रात्री चित्रशिल्प काव्याने होेणार आहे. (प्रतिनिधी)
विजय जोशींना 'किडनॅप' करून आणणार- मुख्यमंत्री
आॅस्ट्रेलिया येथे स्थापत्य अभियंता म्हणून कार्यरत मराठमोळे विजय जोशी यांनी रस्तेनिर्मितीत अटकेपार झेंडा रोवला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या विकासकामांसाठी जोशी यांची मदत घेण्याचे जाहीर केले. त्यांनी खा.रामदास आठवले यांच्या सहवासात राहत असल्याचा दाखला देत वेगळ्या कवितेच्या शैलीत 'ऐलान करतो मी याच मंचावरून विजय जोशीं आणणार 'किडनॅप' करून असे म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. मात्र खड्डेमुक्त रस्त्यांसाठी जोशींचे सहकार्य घेणारच, असेही ते म्हणाले.
माझी मैत्री भाजप, सेनेसोबतही-सुशीलकुमार शिंदे
मी काँग्रेस पक्षाचा असलो तरी पक्षविरहित संबंध जोपासतो. मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधताना माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी माझी मैत्री भाजपसोबत आहेच. मात्र, सेनेसोबतही जवळीक आहे. शोध मराठी मनाचा या जागतिक अकादमी संमेलनातून मराठी माणसाचे वैभव शोधण्याचे काम आयोजकांनी सुरू केले आहे. मराठी माणसाने कुठे झेंडा रोवला, हे या संमेलनातून स्पष्ट होणार आहे. राजकारणात काम करताना समाजात शेवटच्या माणसाचा विचार झाला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.