विदर्भाच्या कॅलिफोनिर्यात संत्रावर शंखी रोगाचा प्रादुर्भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 12:11 PM2024-08-31T12:11:39+5:302024-08-31T12:13:36+5:30

Amravati : संत्रा उत्पादक चिंताग्रस्त; शासनाद्वारे मदतीची प्रतीक्षा

Incidence of conch disease on orange in Shendurjanaghat of Vidarbha | विदर्भाच्या कॅलिफोनिर्यात संत्रावर शंखी रोगाचा प्रादुर्भाव

Incidence of conch disease on orange in Shendurjanaghat of Vidarbha

लोकमत न्यूज नेटवर्क 
शेंदूरजनाघाट :
संत्र्याच्या उत्पादनावर अर्थकारण असलेल्या विदर्भातील कॅलिफोर्नियाचा शेतकरी झाडांवर झालेल्या शंखी रोगाच्या प्रादुर्भावाने हवालदिल झाला आहे. अतिपावसामुळे आधीच आंबिया बहराची संत्री गळून पडत असताना हे मोठे संकट सर्व नेस्तनाबूत करेल, अशी भीती व्यक्त होत आहे. 

नगदी पीक समजल्या जाणारे संत्रा पीक हातचे गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. खरिपातील पिके अतिपावसामुळे बाधित होत असतानाच यंदा संत्र्याच्या दोन्ही बहरांना ग्रहणच लागले. फळगळ होत असल्याने संत्रा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. बाधित झाडांचा सर्व्हे करण्याची मागणी शेंदूरजनाघाट परिसरातील शेतकरी करीत आहेत. बदलत्या वातावरणात व रोगाने संत्रा झाडे पिवळी पडून वाळू लागल्याने विदर्भाचा कॅलिफोर्निया नष्ट होण्याच्या मार्गावर दिसून येत आहे. सततच्या पावसामुळे संत्रा पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने आंबिया बहराच्या गळतीचे प्रमाण ३० ते ४० टक्के एवढे असल्याचे संत्रा उत्पादक बोलत आहेत. त्यामुळे नुकसानाची भरपाई देण्याची माणगी शेतकऱ्यांनी केली आहे.


गळतीने वाढले नुकसान 
यावर्षी सुरुवातीपासून संत्रा फळाला गळती सुरू आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात व ऑगस्ट महिन्यातही दररोज पाऊस असल्याने आंबिया बहराची संत्री मोठ्या प्रमाणात गळत आहेत, तर मृग बहर फुटलाच नाही. यावर्षी आंबिया बहर जानेवारीमध्ये मोठ्या प्रमाणात फुलला होता. मात्र, मार्च, एप्रिल महिन्यातच मोठ्या प्रमाणात गळती लागली. पावसाळा सुरू होताच ही गळती वाढली आहे. संत्रा उत्पादन घेणाऱ्या शेंदूरजनाघाट, तिवसाघाट, बारगाव, जामगाव, धनोडी, लोणी, जरूड, टेंभुरखेडा, मालखेड, धनोडी पंढरी, पुसला, सुरळी, एकदरा, झटामझिरी, वाई, राजुरा बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात संत्रा झाडांवर शंखी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेंत पडला आहे.


"यावर्षी झालेल्या पावसामुळे आंबिया बहराची संत्री गळली. आता झाडे पिवळी पडून वाळत आहेत. शंखी रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. बाधित क्षेत्राचे सर्वेक्षण करून शासनाने त्वरित मदत द्यावी."
- चेतन सावरकर, उत्पादक


"शेंदूरजनाघाट परिसरात आंबिया बहर घेतला जातो. पावसाळ्यात शंखी आल्या व संत्रा झाडे पिवळे पडत आहेत. शासनाने शंभर टक्के अनुदानावर फवारणी औषध उपलब्ध करून द्यावी." 
- सतीश काळे, संत्रा उत्पादके


"फायटोप्थोरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने संत्रा झाडे पिवळे पडून वाळत आहेत. त्यामुळे उत्पादकांचे नुकसान होत आहे. शासनाने संत्रा उत्पादकांना त्वरित मदत जाहीर करावी."
- प्रफुल्ल कुबडे, संत्रा उत्पादक


 

Web Title: Incidence of conch disease on orange in Shendurjanaghat of Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.