मुंबई-हावडा दुरंतो एक्स्प्रेसच्या इंजिनला आग, टाकळी रेल्वे स्थानकावरील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 10:32 PM2019-04-24T22:32:01+5:302019-04-24T22:32:39+5:30
मुंबई-हावडा सुपरफास्ट दुरंतो एक्स्प्रेसच्या इंजिनला बुधवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना बडनेरानजीक टाकळी रेल्वे स्थानकावर घडली.
अमरावती : मुंबई-हावडा सुपरफास्ट दुरंतो एक्स्प्रेसच्या इंजिनला बुधवारी पहाटे २ वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना बडनेरानजीक टाकळी रेल्वे स्थानकावर घडली. त्यामुळे प्रवाशांना पाच तास ताटकळत राहावे लागले. टाकळी रेल्वे स्थानकावर फारशा सुविधा नसल्याने प्रवाशांचे हाल झाल्याची माहिती आहे.
रेल्वे सूत्रानुसार, अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील कुरूम रेल्वे स्थानक मुंबई- हावडा दुरंतो एक्स्प्रेसने सोडल्यानंतर बडनेरापासून १० मिनिटे अंतरावर असलेल्या टाकळी रेल्वे स्थानकावर दुरंतो एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. त्यामधून धूर निघत असल्याचे सहायक चालकाच्या लक्षात आले. त्यानंतर मुख्य चालकाने टाकळी येथे दुरंतो थांबविली. पायलटला विद्युत मोटार जळून खाक झाल्याचे दिसून आले. दुरंतो टाकळी रेल्वे स्थानकावर थांबताच चालक, पायलटने आग विझविण्याचा प्रयत्न केला. टाकळी येथील रेल्वे कर्मचारीदेखील धावून गेले.
दरम्यान ही घटना बडनेरा रेल्वे स्थानकावरील अधिकारी, कर्मचाºयांना माहिती पडताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अमरावती येथून अग्निशमन यंत्रणा टाकळी येथे पोहोचली. मात्र, तेथपर्यंत आग नियंत्रणात आली होती. टाकळी रेल्वे स्थानकावर रात्री २ वाजता थांबलेली दुरंतो पाच तासानंतर बडनेराकडे रवाना झाली.
सेवाग्राम, विदर्भ एक्सप्रेसला विलंबाचा फटका
मुंबई-हावडा एक्स्प्रेसच्या मागे चालणारी दादर-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस आणि मुंबई - गोंदिया विदर्भ एक्स्प्रेसला फटका बसला. मूर्तिजापूर, माना रेल्वे स्थानकावर या दोन्ही गाड्यांना थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. त्यामधील प्रवाशांचेसुद्धा हाल झाल्याची माहिती आहे.