जिल्ह्यात तीन महिन्यांत वाढल्या महिला अत्याचाराची घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 14:09 IST2025-04-01T14:02:59+5:302025-04-01T14:09:52+5:30
बलात्कार, विनयभंग वाढतेच : अल्पवयीन बालिका ठरताहेत लक्ष्य

Incidents of violence against women have increased in the district in three months
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हयाच्या ग्रामीण भागात गेल्या तीन महिन्यांत महिला अत्याचाराचे तब्बल १०० एफआयआर नोंदविण्यात आले आहेत. जानेवारी ते ३० मार्च या कालावधीत जिल्ह्यातील ३१ पोलिस ठाण्यांत बलात्काराचे ३२, तर विनयभंगाचे तब्बल ६८ गुन्हे नोंदविले गेले. गतवर्षी १ जानेवारी ते ३० मार्च या कालावधीत बलात्काराचे केवळ ९, तर विनयभंगाचे ५४ गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे यंदा बलात्काराच्या गुन्ह्यात २३, तर विनयभंगाच्या गुन्ह्यात १४ ने वाढ नोंदविली गेली. विशेष म्हणजे, बलात्काराच्या ३२ एफआयआरमध्ये अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराचा टक्का अधिक आहे.
अलीकडची तरुणाई तर अक्षरशः सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत सोशल मीडियावर तुटून याचा पडलेली असते. सोशल मीडियाचा अतिवापर आजच्या तरुणाईपुढची प्रमुख समस्या बनली आहे. आपण सोशल मीडियाच्या आहारी गेलोय, याची तरुणांना जाणीवही नसते. यातून मुला-मुलींच्या पळून जाण्याचे प्रमाण वाढले आहे. सोशल मीडियावरील अल्पशः ओळखीतून लग्नाचे आमिष, पुढे बलात्कार व त्यापुढे जाऊन कुमारी माता अशा नवीन समस्या निर्माण झाल्या आहेत. तीन महिन्यांत दहापेक्षा अधिक अल्पवयीन मुलींना बलात्कारातून गर्भधारणा झाली.
बलात्काराचे आरोपी ओळखीतील
बलात्कार प्रकरणातील बहुतांश आरोपी हे नात्यातील व ओळखीतील असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदविले आहे. ज्या घटनांमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल होतो, त्या पाठलाग प्रकरणातील आरोपीदेखील अनेकदा ओळखीतीलच असतात.
गतवर्षी ४१२ एफआयआर
सन २०२४ मध्ये बलात्काराचे १३२ तर विनयभंगाचे एकूण २९० एफआयआर नोंदविले गेले होते. त्यातदेखील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार व विनयभंगाचा आकडा मोठा होता.
"किशोरवयीन मुले सोशल मीडियाच्या अधिकाधिक व्यसनाच्या आहारी जात आहेत. सोशल मीडियाचा अतिवापरामुळे व्यक्तीच्या वर्तनात लक्षणीय बदल होत असल्याने आणि अचानक त्याचा वापर बंद केल्याने ते त्रासदायक होऊ शकते."
- किरण वानखडे, पोलिस निरीक्षक, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष