मधुमेह, उच्च रक्तदाब आजाराचा संवर्ग एकमध्ये समावेश करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:12 AM2021-04-16T04:12:54+5:302021-04-16T04:12:54+5:30
अमरावती : मधुमेह, उच्च रक्तदाबाचा आजार असणाऱ्या व व्याधीग्रस्त जोडीदारासह वृद्ध माता-पित्यांची जबाबदारी असणाऱ्या शिक्षकांचा बदली संवर्ग एकमध्ये समावेश ...
अमरावती : मधुमेह, उच्च रक्तदाबाचा आजार असणाऱ्या व व्याधीग्रस्त जोडीदारासह वृद्ध माता-पित्यांची जबाबदारी असणाऱ्या शिक्षकांचा बदली संवर्ग एकमध्ये समावेश करावा, यासह अन्य मागण्यांचे निवेदन ग्रामविकास मंत्री यांच्याकडे शिक्षक परिषदेने दिले.
राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या ३ वर्षे ऑनलाईन पद्धतीने राज्यस्तरावरून होत आहे. मागील वर्षी कोविड -१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे आणि पावसाळ्यामुळे अनेक जिल्ह्यांत बदली प्रक्रिया राबविली गेली नाही. २७ फेब्रुवारी २०१७ च्या जिल्हा अंतर्गत बदली धोरणात बदल करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने ५ सदस्यांचा अभ्यास गट स्थापन केला होता. या गटाच्या अहवालानुसार नवीन बदली धोरण तयार केले. यानुसार ग्रामविकास विभागाने कोवीड काळातही शिक्षकांसाठी आंतरजिल्हा, जिल्हा अंतर्गत बदली आदेश गत ७ एप्रिलला आदेश जाहीर केले आहे. या धोरणातील तरतुदीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाने आवश्यक बदल सुचविले आहेत. यामध्ये सन २०१७ - २०१८ सन २०१८- १९ मध्ये रॅन्डम पद्धतीने डोंगराळ व दुर्गम क्षेत्रात ज्या महिला शिक्षकांची बदली झाली, त्यांना १५ फेब्रुवारी २०१८ च्या ग्रामविकास विभागाच्या बदली शासन निर्णयाप्रमाणे यावर्षीच्या बदली प्रक्रियेत बदली अधिकार प्राप्त (विशेष संवर्ग ३) म्हणून त्यांचा कुठेही संदर्भ (उल्लेख )नाही. अशा दुर्गम क्षेत्रात कार्यरत महिलांना प्रथम प्राध्यान्याने संधी दिली जावी. यासाठी त्यांचा विशेष संवर्ग ३ मध्ये उल्लेख करावा. आदिवासी, पेसा, नक्षलग्रस्त क्षेत्रात १० ते १५ वर्षे काम केलेल्या शिक्षकांना, महिलांना बदली प्रक्रियेतून सूट मिळावी. ते क्षेत्र अवघड क्षेत्र म्हणून संबोधले जावे व त्याची सेवा अवघड क्षेत्रात धरली जावी. मधुमेह उच्च रक्तदाब आजाराचा उल्लेख बदली प्रकारे संवर्ग १ मध्ये करावा. विशेष संवर्ग भाग १ मधील ज्या शिक्षकांची जोडीदार व्याधीग्रस्त आहेत, असे शिक्षक यामध्ये कृपया जोडीदारासह आई-वडील यांचा समावेश करावा, जेणेकरून आईवडिलांची सेवा करणे, वैद्यकीय सुविधांचा लाभ देणे सोयीचे होईल. अशा विविध प्रकारच्या ११ मागण्याबाबत बदली धोरणात समावेश करून नवीन शुद्धीपत्रक प्रसिद्ध करावी अशी मागणी शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, सुधाकर म्हस्के, मधुकर उन्हाळे, बाबुराव पवार विनायक लकडे आदींनी केली आहे.