दुर्गवाडा, धारवाडा या गावांचे दर्जेदार पुनर्वसन योजनेत समावेश करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:17 AM2021-09-15T04:17:29+5:302021-09-15T04:17:29+5:30
अमरावती : निम्न वर्धा प्रकल्पाच्या दुर्गवाडा, धारवाडा या गावांचा दर्जेदार पुनर्वसन योजनेत समावेश करून तिथे अधिकाधिक सुविधा उपलब्ध ...
अमरावती : निम्न वर्धा प्रकल्पाच्या दुर्गवाडा, धारवाडा या गावांचा दर्जेदार पुनर्वसन योजनेत समावेश करून तिथे अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी मंगळवारी नागपूर येथे दिले. या गावांच्या पुनर्वसनाबाबत बैठक नागपूर येथील सिंचन भवनात विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. व्हीआयडीसीचे राजेंद्र मोहिते यांच्यासह अभियंता अधिकारी उपस्थित होते.
ना. ठाकूर म्हणाल्या, दुर्गवाडा, धारवाड्यात १० वर्षांपूर्वी नागरी सुविधात काही सुविधा झाल्या. मात्र योग्य देखभाल झाली नाही. त्यामुळे या गावांचा दर्जेदार पुनर्वसन योजनेत समावेश करून तिथे आवश्यक सुविधा उभाराव्यात. या दोन्ही गावांत पक्के रस्ते निर्माण करावेत. धारवाडा गावातील पाणी पुरवठा योजना बॅकवॉटरमध्ये असल्याने तिचे स्थलांतर व्हावे. दोन्ही गावांमध्ये शाळा, समाजमंदिर परिसराला आवारभिंत बांधून द्यावी, दुर्गवाडा येथे स्वतंत्र क्रीडांगण, आरोग्य उपकेंद्राची इमारत उभारावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
धारवाडा गावातील नाली ओव्हरफ्लो झाल्याने घरात पाणी शिरते. तिथे तत्काळ संरक्षक भिंत उभारावी. धारवाडा गावासाठी वेगळे ग्रामपंचायत भवन उभारण्यात यावे. श्रीक्षेत्र धारेश्वर मंदिर परिसराचा विकास करून तिथे रस्ता व पूल उभारावा. दोन्ही गावांत पथदिवे चांगले नसल्याची स्थानिकांची तक्रार आहे. ते त्वरित बदलून एलईडी लाईट बसवावे व रस्त्याच्या कडेला असलेली ११ केव्ही लाईट तार अंडरग्राऊंड करावी. ही कामे तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. यावेळी दुर्गवाडा-धारवाडा गावातील संदीप ठाकरे, दुर्गवाडाचे उपसरपंच सचिन सोटे, प्रफुल्ल धंदर, उमेश ठाकरे आदी उपस्थित होते.