अभ्यासक्रमात जादूटोणाविरोधी कायद्याचा समावेश करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 11:34 PM2019-08-31T23:34:06+5:302019-08-31T23:35:27+5:30
फुले-शाहू-आंबेडकरांचे पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राची देशात ओळख आहे. तरीही अत्र-तत्र-सर्वत्र अंधश्रद्धादि जादूटोण्याच्या अनेक घटना सातत्याने घडत आहेत. अंधश्रद्धेतून छोट्या बाळांपासून तर वृद्धांपर्यंत आणि स्त्रियांवर अत्याचार होत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात जादूटोणाविरोधी कायद्याचा समावेश करा, अशी मागणी उपेक्षित समाज महासंघ, अंधश्रद्धा निर्मूलन समिती व पुरोगामी संघटनेच्यातीने कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांच्याकडे शनिवारी निवेदनाद्वारे करण्यात आली.
फुले-शाहू-आंबेडकरांचे पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राची देशात ओळख आहे. तरीही अत्र-तत्र-सर्वत्र अंधश्रद्धादि जादूटोण्याच्या अनेक घटना सातत्याने घडत आहेत. अंधश्रद्धेतून छोट्या बाळांपासून तर वृद्धांपर्यंत आणि स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. विद्यापीठात अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून जादूटोणाविरोधी कायद्याच्या अभ्यासाच्या माध्यमातून मिळणाऱ्या ज्ञानाचा कुटुंब आणि समाजामध्ये विवेकनिष्ठ, बुद्धिप्रामाण्यवाद आणि वैज्ञानिक, पुरोगामी दृष्टिकोन रुजविण्यासाठी तसेच समाजातील अंधश्रद्धा दूर होण्यासाठी मदत होईल, असे निवेदनात नमूद करण्यात आले.
उपेक्षित समाज महासंघाचे अध्यक्ष श्रीकृष्ण बनसोड, कार्याध्यक्ष श्रीकृष्णदास माहोरे, मिलिंद वाघळे, पुरुषोत्तम नागपुरे, मधुकर कोहळे, रजिया सुलतान, श्रीकृष्ण धोटे यांनी ही मागणी कुलगुरूंकडे केली. गोंडवाना विद्यापीठाच्या विधिसभा बैठकीतील निर्णयानुसार बी.ए. अंतिमच्या समाजशास्त्र विषयात जादूटोणाविरोधी कायद्याचा समावेश करण्यात आला आहे, हे विशेष!
संत गाडगेबाबांनी समाजप्रबोधन व अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आयुष्य वेचले. समाजाला पुरोगामी व वैज्ञानिक दृष्टी दिली. त्यांचे क्रांतिकार्याला आदरांजली म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात जादूटोणाविरोधी कायद्याचा समावेश करून ऐतिहासिक व आजच्या संदर्भात फारच महत्त्वाचा निर्णय घ्यावा, अशी विनंती करण्यात आली.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात जादूटोणाविरोधी कायद्याचा समावेश करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन कुलगुरू चांदेकर यांनी यावेळी दिले.