Amravati | माजी जि.प. सदस्याच्या घरी आयकरची धाड; नागपूर आयुक्तांची कारवाई

By गजानन चोपडे | Published: September 7, 2022 03:21 PM2022-09-07T15:21:39+5:302022-09-08T15:51:27+5:30

पथ्रोट पोलीस अनभिज्ञ

Income Tax Department raids the farm house of the former GIP member | Amravati | माजी जि.प. सदस्याच्या घरी आयकरची धाड; नागपूर आयुक्तांची कारवाई

Amravati | माजी जि.प. सदस्याच्या घरी आयकरची धाड; नागपूर आयुक्तांची कारवाई

Next

अमरावती (पथ्रोट) : जिल्हा परिषदेच्या चिखली (ता. चिखलदरा) सर्कलच्या माजी सदस्य वासंती मंगरोळे यांच्या घरी तसेच वाल्मीकपूर शिवारातील फार्म हाऊसवर आयकर विभागाने धाड घातली. बुधवारी सकाळपासून करण्यात आलेली ही कारवाई कमालीची गोपनीय होती. अमरावती व नागपूर येथील आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या धाडसत्राचे नेतृत्व केले.

प्राप्त माहितीनुसार, तपासाकरिता फार्म हाऊसव्यतिरिक्त तेलंगखडी येथील नातेवाइकांच्या घरांची तपासणी व अंजनगाव मार्गावरील जुन्या घराची झडती घेण्यात आली. त्याकरिता पाच वाहनांमधून चमू आली होती. तथापि, आयकर विभागाच्या एका अधिकाऱ्याने हा नियमित तपासाचा भाग असल्याचे सांगितले.

आयकर विभागाने बुधवारी दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, मुंबई, छत्तीसगड, उत्तराखंड, बंगळुरूमधील अनेक बड्या उद्योग समूहांवर छापे टाकले आहेत. करचोरी आणि राजकीय फंडिंगमुळे हे व्यावसायिक आयटीच्या रडारवर होते. बुधवारी सकाळी या टीमने वेगवेगळ्या राज्यांमध्ये ५३ ठिकाणी छापे टाकले. छाप्यात आयकर विभागाने तब्बल १०० वाहने वापरली. त्यातील एका पथकाने पाच वाहनांनी अचलपूर तालुक्यातील पथ्रोट गाठले. आयकर विभागाच्या चमूने वासंती मंगरोळे यांच्याशी संबंधित प्रतिष्ठानांवर धाड टाकली. तेथून दस्तावेज ताब्यात घेण्यात आला.

दरम्यान, मंगळवारी गणेश उत्सवाच्या निमित्ताने झालेल्या जंगी भोजनावळीत बऱ्याच शासकीय अधिकाऱ्यांनी हजेरी लावली होती. यानंतर सकाळीच नागपूर आयकर विभागाच्या धाड पथकाचे सुटाबुटातील अधिकारी चकचकीत वाहनातून दाखल झाले. ती वाहने मंगळवारी रात्री मुक्कामास असलेल्या पाहुण्यांची असावी, असा अंदाज काही जणांनी बांधला व त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, दुपारी शेतातून परतल्यावर आयकर विभागाची धाड असल्याचे माहिती पडल्यानंतर आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

याबाबत 'त्या' माजी महिला जि.प. सदस्यांशी संपर्क होऊ शकला नाही. पथ्रोट येथे यापूर्वी आयकर विभागाने अकोला येथे कार्यरत व सध्या सेवानिवृत्त झालेल्या पोलीस अधिकाऱ्याच्या प्रथम नगराध्यक्ष राहिलेल्या नातेवाइकाच्या घरी छापे टाकल्याच्या वृत्तास या घटनेने उजाळा मिळाला.

मिड डे मिल घोटाळ्याशी संबंध?

राजस्थानमधील मिड डे मिल घोटाळ्याबाबत आयटीने मुंबई, राजस्थान, उत्तराखंड आणि दिल्लीतही छापे टाकले आहेत. बंगळुरूच्या मणिपाल ग्रुपवरही आयटीची धाड पडली. तर राजस्थानच्या जयपूरमध्ये मिड डे मिलमधून कमाई करणाऱ्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत. पथ्रोटमध्येदेखील त्याच अनुषंगाने ‘रेड’ टाकल्याचे एका आयकर अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Income Tax Department raids the farm house of the former GIP member

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.