अपूर्ण घरकुले; १४ एचओंडीची स्पॉट व्हिजिट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 11:56 AM2024-05-21T11:56:13+5:302024-05-21T12:00:49+5:30
सीईओंनी सोपविली होती जबाबदारी : २८ ग्रामपंचायतींमधील गावात पडताळणी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शासनाने घरकुल योजनेच्या माध्यमातून मंजूर घरकुल लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देऊनही ग्रामीण भागात घरकुलाची पेंडन्सी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे अपूर्ण असलेली घरकुलाची कामे तातडीने सुरू करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांनी कडक पावले उचलत आपल्या अधिनस्त असलेल्या १४ विभागांच्या प्रमुखांना या ठिकाणी स्पॉट व्हिजिट करण्याचे निर्देश दिले होते.
या भेटीदरम्यान प्रत्यक्ष लाभार्थ्याशी भेटून बंद असलेले घरकुलाचे कामे तातडीने सुरू करण्यासाठी प्रवृत्त करण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानुसार या विभागप्रमुखांनी २८ ग्रामपंचायतींमधील विविध गावांत स्पॉट व्हिजिट करत घरकुलाच्या कामाची पाहणी केलेली आहे.
जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्यांना घरकुल मंजुरीनंतर चार टप्प्यांत घरकुलाचा निधी दिला जातो. केंद्र पुरस्कृत आवास योजनेंतर्गत सन २०१६ ते २०२२ या कालावधीत मंजूर केलेल्या घरकुलाच्या लाभार्थ्यांना पहिला हप्ता वितरित केला. मात्र, घरकुल बांधकामास सुरुवात न केल्याने दुसरा व तिसरा हप्ता वितरित केला नाही. घरकुल पूर्णत्वाची जिल्ह्याची प्रगती राज्यस्तरावर मागे पडत असल्याने शासनाकडून याची दखल घेत तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील किमान दोन ग्रामपंचायती अशा २८ ग्रामपंचायतींमध्ये अर्धवट घरांच्या स्पॉट व्हिजिटसाठी निवडले होते. यासाठी झेडपीच्या १४ खातेप्रमुखांना जबाबदारी सोपविली होती. सीईओंनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे या अधिकाऱ्यांनी मागील आठवड्यातच २८ ग्रामपंचायतींत स्पॉट व्हिजिट दिली आहे.
या दरम्यान, येथील पहिल्या हप्त्यानंतर घरकुल न बांधण्याचे कारण तसेच संबंधित लाभार्थ्याशी अडचणी प्रत्यक्ष संवादादरम्यान जाणून घेण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या या भेटीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सादर केला आहे. यावर आता पुढील कारवाईबाबत दिशा मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात ठरणार आहे
या ग्रामपंचायतींना दिल्या भेटी
भातकुली तालुक्यातील पूर्णानगर, खारतळेगाव, धामणगाव रेल्वेमधील मंगरुळ दस्तगीर, विरुळ राधे, अमरावती तालुक्यातील वलगाव, यावली, वरूड तालुक्यातील मांगरोळी, जरूड, अचलपूर मधील शिंदी बु., पथ्रोट, धारणीतील हरिसाल, रंगुबेली, चिखलदरातील रायपूर, चिखली, अंजनगाव सुर्जीमधील चौसाळा, कापुसतळणी, नांदगाव खंडेश्वरमधील खानापूर, दाभा, चांदूरबाजारमधील विश्रोळी, सोनोरी, चांदूर रेल्वेमधील घुईखेड, राजुरा, मोशातील अंबाडा, नरपिंगळाई, तिवसामधील शिरजगाव मोझरी, तळेगाव व दर्यापूरमधील येवदा, सांगळूद या ग्रामपंचायतींचा समावेश होता.